coronavirus: श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

By बाळकृष्ण परब | Published: September 23, 2020 09:57 AM2020-09-23T09:57:07+5:302020-09-23T10:08:41+5:30

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाला रोखण्याचे सर्वच उपाय निष्प्रभ ठरल्याने आता सर्वांचे लक्ष आता कोरोनाविरोधात विकसित होत असलेल्या लसीकडे लागले आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाला रोखण्याचे सर्वच उपाय निष्प्रभ ठरल्याने आता सर्वांचे लक्ष आता कोरोनाविरोधात विकसित होत असलेल्या लसीकडे लागले आहे. या परिस्थितीत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी एक चिंता वाढवणारे विधान केले आहे.

बलराम भार्गव म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे संक्रमित झालेल्या श्वसनाच्या रुग्णांवर कुठलीही लस १०० टक्के प्रभावी ठरणार नाही. सध्यातरी आम्ही १०० टक्के प्रभावी लस विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. मात्र हे प्रमाण ५० ते १०० टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ५५ लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे ८८ हजारहून अधि लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनावरील तीन लसी विकसित करण्याचे काम सुरू आहे. या लसी वैद्यकीय चाचणीच्या विविध टप्प्यात आहेत. मात्र भारतात कोरोनावरील लस कधीपर्यंत मिळेल, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाविरोधातील कुठल्याही लसीसाठी तीन अटी ठेवल्या होत्या. त्या म्हणजे सुरक्षितता, इम्युनिटी वाढवण्याची क्षमता आणि त्याची उपयुक्तता. त्यामुळेच मी सांगतो की, ज्या व्यक्ती श्वसनाच्या आजारांचा सामना करत आहेत, अशांसाठी कोरोनावरील लस तितकीशी प्रभावी ठरणार नाही, असे भार्गव यांनी सांगितले.

आयसीएमआरचे महासंचालक यांनी सांगितले की, सध्या भारतात कॅडिला आणि भारत बायोटेक यांनी कोरोनाच्या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण केली आहे. तर सीरम इंस्टिट्युटने दुसऱ्या टप्प्यातील बी ३ चाचण्या पूर्ण केल्या आहेत. आता परवानगी मिळाल्यावर त्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण होतील.

दरम्यान, कोरोनाबाबतचे गणितीय मॉडेल हे केवळ सावध होण्यासाठी उपयुक्त आहे. कोरोनाचा फैलाव होण्यासाठी कुठल्या बाबी कारणीभूत आहेत, हे कुठलेही गणितीय मॉडेल सांगू शकत नाही, असे ही भार्गव यांनी स्पष्ट केले.

देशाची ऑक्सिजनच्या उत्पादनाची क्षमता ही ६ हजार ९०० मेट्रिक टन आहे. देशात ऑक्सिजनची कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. मात्र राज्यांनी इन्व्हेंट्री व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे, असेही भार्गव यांनी सांगितले.