Pooja Chavan Suicide Case: शिवसेनेचा विदर्भातील वाघ 'घरी' गेला, उद्धव ठाकरेंनी 'मेसेज' दिला, पण... 

By यदू जोशी | Published: February 28, 2021 05:13 PM2021-02-28T17:13:10+5:302021-02-28T18:24:50+5:30

Shiv sena Minister Sanjay Rathod resigns in Pooja Chavan suicide case: शेवटी शिवसेनेच्या विदर्भातील एका वाघाला घरी जावे लागले आहे. ज्या वाघ, बिबटे जंगली जनावरं सांभाळण्याची जबाबदारी वनखात्याकडे आहे, त्या खात्याचे मंत्री यवतमाळ जिल्ह्यातील वाघ पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

Pooja Chavan Suicide Case: CM Uddhav Thackeray take Action against Shivsena Minister Sanjay Rathod | Pooja Chavan Suicide Case: शिवसेनेचा विदर्भातील वाघ 'घरी' गेला, उद्धव ठाकरेंनी 'मेसेज' दिला, पण... 

Pooja Chavan Suicide Case: शिवसेनेचा विदर्भातील वाघ 'घरी' गेला, उद्धव ठाकरेंनी 'मेसेज' दिला, पण... 

Next
ठळक मुद्देबंजारा समाजात गेल्या काही वर्षानंतर संजय राठोड यांच्या रुपाने नवं नेतृत्व मिळालं होतं, परंतु त्यांच्या नेतृत्वाला राजीनाम्यामुळे मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील एका दमदार मंत्र्यांनी राठोड यांचा बचाव करण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाहीदेवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेनं त्यांना राज्यमंत्रीपद दिलं आणि महाविकास आघाडी सरकार आल्यावर ते वनमंत्री झाले.एकामागून एक यशाच्या शिड्या चढत असलेल्या संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने मात्र पार जमिनीवर आणून ठेवलं आहे.

यदु जोशी

मुंबईः वनमंत्री संजय राठोड यांना अखेर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून मुंबईत सुरू होत आहे, संजय राठोड जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपण अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली होती, भाजपाने आणलेला मोठा दबाव आणि एकामागून एक राठोडांचा खोलात चाललेला पाय, तसेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची त्यांचे नाव जोडले जाते यामुळे संजय राठोडांची गच्छंती अटळ असल्याचं चित्र होतं.(Shivsena Minister Sanjay Rathod Resined from Mahavikas Aghadi Government, Due to Allegations in Pooja Chavan Suicide Case)

शेवटी शिवसेनेच्या विदर्भातील एका वाघाला घरी जावे लागले आहे. ज्या वाघ, बिबटे जंगली जनावरं सांभाळण्याची जबाबदारी वनखात्याकडे आहे, त्या खात्याचे मंत्री यवतमाळ जिल्ह्यातील वाघ पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. बंजारा समाजात गेल्या काही वर्षानंतर संजय राठोड यांच्या रुपाने नवं नेतृत्व मिळालं होतं, परंतु त्यांच्या नेतृत्वाला राजीनाम्यामुळे मोठा धक्का बसला आहे. 

एका तरुणीचं आत्महत्या प्रकरण त्यापूर्वी तिचा यवतमाळच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये गर्भपात झाला असल्याची चर्चा, एकामागून एक आलेल्या ऑडीओ क्लिप्स आणि त्यामधील कथित आवाज संजय राठोड यांचा असल्याचा संशय या सगळ्या गोष्टींमुळे संजय राठोड यांची अडचण दिवसेंदिवस वाढत होती. ७ फेब्रुवारीला टिकटॉक स्टार  पूजा चव्हाणने आत्महत्या केली, त्याच्या एक दिवसाआधी यवतमाळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये पूजा अरुण राठोड या तरुणीचा गर्भपात करण्यात आला होता, आता पूजा अरुण राठोड म्हणजेच पूजा चव्हाण असा संबंध जोडले जात आहे, पहाटेच्या अंधारात पूजा राठोडचा केलेला गर्भपात त्याचे कुठलेही पुरावे नाहीत, सीसीटीव्ही फुटेज नाही, त्याच्या नोंदी गायब करणे एकूणच यवतमाळच्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांची अत्यंत संशयास्पद भूमिका आणि ऑडिओ क्लिपमध्ये पुरावे नष्ट करण्यासंदर्भात असलेल्या सूचना या एकेक गोष्टी संजय राठोड यांच्या गळ्याशी येत गेल्या, त्यामुळे 'मातोश्री'चा लाडका मंत्री हतबल झाला, त्यातच भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आठ-दहा दिवस किल्ला लढवला त्यात राठोड घायाळ झाले, वृत्तपत्रे, चॅनल आणि एकूणच प्रसिद्धीमाध्यमांनी राठोड यांचा बुरखा फाडला, शिवसेनेतील एका दमदार मंत्र्यांनी राठोड यांचा बचाव करण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही, ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही असं शिवसेनेच्या नेतृत्वाच्या लक्षात आले, 

पूजा चव्हाण आत्महत्या, संजय राठोडांच्या ‘त्या’ १० चुका अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश

आपण घ्याल तो निर्णय मान्य असेल असं संजय राठोडांनी म्हटलं, परंतु त्याचसोबत मंत्रिपद वाचवण्याचेही प्रयत्नही केले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात गर्दी जमवू नये, असं आवाहन केले असताना, १५ दिवस बेपत्ता असलेले संजय राठोड बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी गडावर अचानक प्रगट झाले, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले, त्यामुळे ते अडचणीत आले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जे आवाहन केले होते, त्याचा जाहीरपणे छेद देण्याचा प्रयत्न त्यांच्याच पक्षाच्या नेत्याने केला, संजय राठोड यांच्या राजीनाम्याने हे प्रकरण संपणार आहे का? संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला न्याय आहे असं म्हणता येणार नाही, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अनेक शंका विरोधकांनी उपस्थित केल्या आहेत, पूजा चव्हाणसोबत असलेले ते दोघंही कुठे आहेत, लपून बसले आहेत का? त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती समोर येत नाही, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात हे दोघं महत्त्वाचे साक्षीदार ठरू शकतात, परंतु या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही, संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे विदर्भातील एक महत्त्वाचा नेता कमालीचा अडचणीत आला, मात्र चौथ्यांदा विधानसभेवर निवडून आलेले आणि बंजारा समाजात अत्यंत लोकप्रिय असलेले नेतृत्व या प्रकरणामुळे बदनाम झाले आहे, संजय राठोड यांच्या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारची बदनामी झाली, त्यामुळे राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) मंत्रिमंडळात ठेवणार नाहीत अशी अटकळ होती, अखेर संजय राठोड यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला आहे.

राजीनामा घेतला, पण...

राठोड यांच्या राजीनाम्याआड जर पूजा चव्हाणला न्याय मिळणार नसेल तर तो एक मोठा अन्याय ठरेल. राठोड यांचा राजीनामा घ्यायचा आणि प्रकरणावर पडदा पाडायचा असं मात्र होता कामा नये. बंजारा समाजामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली ही टिकटॉक स्टार. हिला आपला जीव देण्याची का इच्छा झाली, तिच्यावर कुणाचा दबाव होता, तिला कुठल्या दुःखातून- वेदनांमधून जावं लागत होतं, तिची कुणी फसवणूक केली का, तिची आत्महत्या होती की आणखी काही, हे सगळे पोलिसांच्या तपासाचे विषय आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन एकप्रकारे आपल्या पक्षात अशा पद्धतीचे आरोप असलेल्या व्यक्तीला खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला आहे. मात्र त्याचवेळी ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी अखेर हा निर्णय घेतला, त्याच पद्धतीने पूजा चव्हाणच्या आत्म्यालाही न्याय मिळण्याची आवश्यकता आहे. 

राजकीय उदय... दणदणीत यश... पण पुढे काय? 

यवतमाळ हा एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसने दगडाला शेंदूर फासल्यासारखा एखादा कुणीही उमेदवार द्यावा आणि तो निवडून यावा, अशी वर्षानुवर्षे काँग्रेसची या जिल्ह्यावर मक्तेदारी होती.. भाजपाचे अगदी सुरुवातीच्या काळातले राज्य प्रदेश संघटन मंत्री होते वसंतराव भागवत, ते असं म्हणायचे की, यवतमाळमध्ये ज्या दिवशी भाजपाचा खासदार पहिल्यांदा निवडून येईल, तेव्हा केंद्रात भाजपाचं सरकार येईल आणि यवतमाळ जिल्ह्यात ज्यावेळी भाजपाचा आमदार निवडून येईल, त्यावेळी भाजपाचं राज्यात सरकार येईल. तसंच झालं. भाजपाने हळूहळू या जिल्ह्यामध्ये हातपाय पसरले. नाईक घराण्याने आपली निष्ठा राष्ट्रवादीकडे वळवली. त्यामुळे राष्ट्रवादीचाही बोलबाला झाला. म्हणजे भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या या गडामध्ये संजय राठोड या उमद्या तरुणाने या तिन्ही पक्षांना आव्हान देत स्वतःची जागा बनवली. एकदा नाही, दोनदा नाही, चौथ्यांना ते विधानसभेवर निवडून गेले. एक बेदरकार, बिनदिक्कत सर्वांना मदत करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. त्या प्रतिमेने त्यांना जनमानसात आणि विशेषतः बंजारा समाजात एक मजबूत स्थान मिळवून दिलं. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेनं त्यांना राज्यमंत्रीपद दिलं आणि महाविकास आघाडी सरकार आल्यावर ते वनमंत्री झाले. 

आता शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा: चंद्रकांत पाटील

एकामागून एक यशाच्या शिड्या चढत असलेल्या संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने मात्र पार जमिनीवर आणून ठेवलं आहे. आज त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पुढच्या काळात चौकशी काय होईल, चौकशीत ते दोषी आढळतील का, ते दोषी आढळले तर किंवा आढळले नाहीत, तर त्यांच्या राजकारणाची पुढची वाटचाल काय असेल, हे सगळे प्रश्न काळाच्या उदरात आहेत. मात्र आज तरी संजय राठोड नावाचा वाघ पिंजऱ्यात बंद झाला आहे.

"आता संजय राठोडचा राजीनामा म्हणजे, सरकारचं तेलही गेलं अन्..."; भाजपचा उद्धव सरकारवर थेट निशाणा

Web Title: Pooja Chavan Suicide Case: CM Uddhav Thackeray take Action against Shivsena Minister Sanjay Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.