Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या, संजय राठोडांच्या ‘त्या’ १० चुका अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश

By प्रविण मरगळे | Published: February 28, 2021 04:12 PM2021-02-28T16:12:30+5:302021-02-28T16:25:31+5:30

अखेर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अडकलेले शिवसेना मंत्री संजय राठोड(Shivsena Sanjay Rathod) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे(CM Uddhav Thackeray) राजीनामा दिला आहे, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारची चहुबाजुने कोंडी केली होती, अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत ठाकरे सरकारला घेरण्याची तयारी केली होती. (Minister Sanjay Rathod Resignation in Pooja Chavan Suicide Case)

संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील पहिल्याच मंत्र्याचा राजीनामा घेण्यात विरोधी पक्ष भाजपाला(BJP) यश आलं आहे. धनंजय मुंडे प्रकरणात काहीशी मवाळ असलेल्या भाजपाने संजय राठोड प्रकरणात आक्रमकरित्या पत्रकार परिषद घेत राजीनाम्याची मागणी लावून धरली होती, त्यात मागील काही दिवस या प्रकरणामुळे सरकारभोवती संशयाचं वातावरण विरोधकांनी निर्माण केले होते.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्या १० चुकांमुळे त्यांच्यावर राजीनाम्याची वेळ आल्याचं म्हटलं जातं, त्यातील प्रामुख्याने पहिलं कारण म्हणजे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर तब्बल १५ दिवस राठोड बेपत्ता राहिले, त्यांनी स्वत:ची बाजू माध्यमांसमोर येऊन मांडली नाही, धनंजय मुंडे प्रकरणात आरोप झाल्यानंतर त्यांनी तात्काळ फेसबुकद्वारे या प्रकरणावर भाष्य केले, परंतु संजय राठोड यांच्याबाबत असं काहीच घडलं नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं.

१५ दिवस बेपत्ता झाल्यानंतर अचानक पोहरादेवी गडावर शक्तीप्रदर्शन करत संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येऊन त्यांची बाजू मांडली, परंतु यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा करून त्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी नाराज झाले, कोरोना काळात गर्दी करू नये या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला स्वत: शिवसेना मंत्री केराची टोपली दाखवतो असा संदेश विरोधकांनी समाजमाध्यमातून जनतेला दिला.

संपूर्ण पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला, माध्यमांसमोर बोलताना संजय राठोड यांनी मी मागासवर्गीय जातीतून ओबीसी समाजाचं नेतृत्व करतो, म्हणून असं घाणेरडे राजकारण माझ्या बदनामीसाठी केलं जातंय असा आरोप केला, या प्रकरणाच्या निमित्ताने जातीय रंग देऊन मुद्दा विचलित करण्याचा संजय राठोड यांनी प्रयत्न केला.

संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येऊन ज्यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाष्य केले, तेव्हा विविध प्रश्नांना त्यांनी बगल देऊन केवळ या प्रकरणाचा माझ्याशी काहीही संबंध नाही, पोलीस याची चौकशी करतंय इतकं सांगून मी निर्दोष आहे हेच सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला होता.

या आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्या, या ऑडिओ क्लिपबाबत संजय राठोड यांनी कुठलंही भाष्य केले नाही, संजय राठोड यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी यावर प्रश्न विचारले असता राठोड यावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.

ऑडिओ क्लिपबाबतच्या सत्यतेवरही संजय राठोड यांनी बोलण्यास नकार दिला, तसेच पूजा चव्हाणसोबत असलेले फोटोही कार्यकर्त्यांसोबत मी वावरतो तेव्हा अनेक लोक फोटो काढतात असं सांगून त्यांनी पूजा चव्हाणसोबत असलेल्या फोटोवर प्रतिक्रिया दिली, परंतु पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे अनेक वैयक्तिक फोटो व्हायरल झालेत त्यावर ते काहीच बोलले नाहीत.

संजय राठोड प्रकरणामुळे भाजपाला ठाकरे सरकार विशेषत: शिवसेनेची कोंडी करण्याचा आयता मुद्दा सापडला होता, या प्रकरणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टार्गेट केले जाऊ लागले, यातच शक्तीप्रदर्शन करून संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला थेट आव्हान देण्याचा प्रकार केला, त्यामुळे मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबद्दल नाराजी वाढली.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यावर अशाप्रकारे आरोप होत असताना शिवसेनेचे कोणतेही नेते त्यांच्या मदतीला आले नाही, तर काँग्रेस राष्ट्रवादीचे नेतेही या प्रकरणापासून सावध भूमिका घेत होते, त्यामुळे संजय राठोड हे एकाकी पडले.

भाजपाच्या चित्रा वाघ यांनी एकापाठोपाठ एक संजय राठोड प्रकरणात ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला, विविध ऑडिओ क्लिप, मोबाईल संवाद यामाध्यमातून पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले, अशातच या विषयावर सरकारमधील कोणताही मंत्री बाजू मांडण्यासाठी पुढे सरसावला नाही, या मुद्द्यावरून भाजपा अधिवेशनात सरकारची कोंडी करणार हे ध्यानात घेऊन मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांचा राजीनामा घेतला असावा.

या प्रकरणात सर्वात महत्त्वाचे म्हणजे अरूण राठोड आणि विलास चव्हाण हे दोघंही अद्याप गायब आहेत पूजा चव्हाण हिच्यासोबत पुण्यात हे दोघं राहत होते, संजय राठोड यांचं या दोघांशी फोनवरून बोलणं होत होतं, त्याच ऑडिओ क्लीप सोशल मीडियात व्हायरल झाल्या, मात्र या प्रकरणात या दोघांना कस्टडीत का घेतलं नाही असा सवाल भाजपाने केला होता, मात्र हे दोघं गायब असल्याची माहिती आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संशयाची सुई आणखी बळावली.