"...तर त्यात गैर काय?"; 'झिंगाट' डान्सवरील दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 05:19 PM2021-05-25T17:19:26+5:302021-05-25T17:21:27+5:30

NCP Rohit Pawar Slams BJP Pravin Darekar : "पीपीई किट न घालता रोहित पवारांनी डान्स केला. शरद पवार यांचे नातू आहेत, म्हणून रोहित यांना दुसरा न्याय का?" असा सवाल दरेकरांनी विचारला होता. त्यावर आता रोहित पवार यांनीही जोरदार प्रत्युतर दिलं आहे.

NCP Rohit Pawar Slams BJP Pravin Darekar Over dancing with corona patients | "...तर त्यात गैर काय?"; 'झिंगाट' डान्सवरील दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

"...तर त्यात गैर काय?"; 'झिंगाट' डान्सवरील दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

Next

मुंबई - कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचा सैराटच्या झिंगाट गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हाय़रल झाला आहे. रोहित पवार आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला रोहित यांनी सोमवारी भेट दिली. रुग्णांचे मनोबल वाढावे, तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहित पवार हे रुग्णांच्या चेहऱ्यावरील निराशा दूर करण्यासाठी रुग्णांसोबत सहभागी होत झिंगाट गाण्यावर थिरकले. या डान्सवरुन विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी रोहित यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्र सोडलं. 

"पीपीई किट न घालता रोहित पवारांनी डान्स केला. शरद पवार यांचे नातू आहेत, म्हणून रोहित यांना दुसरा न्याय का?" असा सवाल दरेकरांनी विचारला होता. त्यावर आता रोहित पवार यांनीही जोरदार प्रत्युतर दिलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "सन्माननीय प्रविण दरेकर साहेब कोविड सेंटरमधली माणसं माझ्या कुटुंबातली असून त्यांच्यासाठी कितीही केलं तरी ते कमी आहे. त्यामुळं शक्य ते सगळं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतो. त्यांना काल एकच दिवस भेटलो असं नाही तर नेहमीच भेटतो" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"माझ्या मतदारसंघातले अधिकारी आणि नागरिकही या रुग्णांची जमेल तशी सेवा करतात. कोविडमुळे खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळं धीर येत असेल, त्यांच्या आनंदात दोन मिनिटं सहभागी झाल्याने तो द्विगुणित होत असेल तर त्यात गैर काय? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी आनंद आहे" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच "आणि हो... ५ वी नापास झालेल्या गुजरातमधल्या एका आमदारासारखं मी रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही. तसंच आपल्याही पक्षाचे अनेक नेते पीपीई किटशिवाय रुग्णांना भेटले, तेव्हा त्यांच्या निदर्शनास आपण ही गोष्ट आणून दिल्याचंही काही दिसलं नाही! असं का?" असा सवाल देखील रोहित पवारांनी विचारला आहे. 


 

Web Title: NCP Rohit Pawar Slams BJP Pravin Darekar Over dancing with corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.