'वाकडीचं रिंगण दाखवून राजकारणातील हीन प्रवृत्ती ठेचण्याची पंढरपूरकरांना संधी'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 07:15 PM2021-04-13T19:15:23+5:302021-04-13T19:15:44+5:30

भगीरथ नाना भारत नानांचे केवळ रक्ताचे नाही तर त्यांच्या विचारांचे आणि पंढरपूरच्या विकासाच्या स्वप्नाचे वारसदार आहेत : धनंजय मुंडे

ncp leader dhananjay munde slams opposition on pandharpur byelections | 'वाकडीचं रिंगण दाखवून राजकारणातील हीन प्रवृत्ती ठेचण्याची पंढरपूरकरांना संधी'

'वाकडीचं रिंगण दाखवून राजकारणातील हीन प्रवृत्ती ठेचण्याची पंढरपूरकरांना संधी'

Next

"भारत नाना आपल्याला अर्ध्यात सोडून जातील आणि त्यांच्या जागी त्यांच्या मुलाचा प्रचार करण्याची वेळ माझ्यावर येईल असं मला कधी वाटलं नव्हतं. नानांनी मला नेहमीच वडिलकीची माया दिली. आज त्यांच्या जागी पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांचे चिरंजीव भगीरथ दादा उभे आहेत, भगीरथ दादा नानांचे केवळ रक्ताचे नाही तर नानांच्या विचारांचे आणि या भागाच्या विकासाचे जे स्वप्न नानांनी पाहिले त्या स्वप्नाचे देखील वारसदार आहेत, या वारसदारास मी आशीर्वाद मागायला आलो आहे," अशी भावनिक साद सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वाकडी येथील प्रचार सभेत घातली आहे.

पंढरपूर तालुक्यातील वाकडी येथे सर्व वारकरी दिंड्या विसाव्यास येतात, आज गुढीपाडव्याच्या दिवशी वाकडी येथे प्रचारास येणे हा माझ्यासाठी भाग्यवह योगायोग आहे. ही निवडणूक पक्ष विरुद्ध पक्ष अशी नसून आता सत्य विरुद्ध प्रत्येक गोष्टीत हीन दर्जाचे राजकारण करणाऱ्या प्रवृत्ती अशी आहे आणि या अपप्रवृत्तींना इथल्या जनतेनेच आता 'रिंगण' दाखवावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले.

"मी कच्च्या गुरूचा चेला नाही, असं भारत नाना म्हणायचे, मी देखील कच्च्या गुरूचा चेला नाही," असं म्हणत मुंडेंनी विरोधकांचा समाचार घेतला. खा. शरद पवार यांच्या पावसाच्या सभेची आठवण सांगत, काल परवा जयंत पाटील यांच्या सभेत पाऊस आला आणि विरोधकांनी त्याचा धसकाच घेतला, त्यांना आमच्या सभांमध्ये पाऊस आला की धसकाच बसतो, अशी मिश्किल टिप्पणी मुंडेंनी केली.

... आणि आम्हाला शेतकरी विरोधक म्हणतात

"दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी कित्येक दिवसांपासून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनाला बसले आहेत आणि भाजपचे नेते आम्हाला शेतकरी विरोधी म्हणतात! मुळात केंद्रातले सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आणि धनदांडग्यांच्या हिशोबात आहे," अशी टीकाही यावेळी मुंडेंनी केली. सत्ता काबीज करण्याच्या नादात भाजपकडून अत्यंत हीण दर्जाचे राजकारण केले जात आहे. भारत नानांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या विकासाच्या स्वप्नांवर, त्यांच्या कुटुंबावर टीका करणे हे या अपप्रवृत्तींनी सुरू केलं आहे, या अपप्रवृत्ती भगीरथ दादांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन इथल्या जनतेने ठेचून काढाव्यात असे आवाहनही यावेळी धनंजय मुंडे यांनी केले.

Web Title: ncp leader dhananjay munde slams opposition on pandharpur byelections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.