NCP Clyde Crasto Slams BJP Chandrakant Patil Over Ajit Pawar And Thackeray Government Statement | "चंद्रकांतदादांना मत देऊन चूक तर केली नाही ना?; कोथरूडमधील जनतेला प्रश्न पडला असावा"

"चंद्रकांतदादांना मत देऊन चूक तर केली नाही ना?; कोथरूडमधील जनतेला प्रश्न पडला असावा"

मुंबई - ठाकरे सरकार पडणार नाही असं अजित पवारांना सारखं सारखं का सांगावं लागतं, असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपस्थित केला होता. सरकार पडणार नसल्याचा विश्वास असेल तर मग इतकं आकांडतांडव कशासाठी करता? आम्ही काही सत्ताबदलाची आस लावून बसलेलो नाही. पण राज्यात सत्ताबदल कसा होणार हे अजित पवारांना माहीत आहे. ते सध्या खोटा आव आणत आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला होता. त्यानंतर आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला लगावला आहे. 

"चंद्रकांतदादांना मत देऊन चूक तर केली नाही ना?; कोथरूडमधील जनतेला प्रश्न पडला असावा" असं म्हणत क्रास्टो यांनी पाटलांवर जोरदार टीका केली आहे. क्लाईड क्रास्टो यांनी गुरुवारी (15 एप्रिल) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत हल्लाबोल केला आहे. "चंद्रकांत पाटील जी, जेवढा वेळ संभ्रम निर्माण करण्यात लावताय, तेवढा वेळ मतदारसंघातील लोकांना दिला असता तर... तुमच्या मतदारांना मदत झाली असती. आता त्यांच्या मनात प्रश्न 'पडणार',आम्ही चंद्रकांतदादांना मत देऊन चूक तर नाही केली ना?" असं क्रास्टो यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

भगीरथ भालकेंच्या प्रचारासाठी आलेले अजित पवार अनेकदा भाजपला लक्ष्य करत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. हे सरकार पाडणं येऱ्यागबाळ्याचं काम नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर हल्ला चढवत आहेत. अजित पवारांकडून होत असलेल्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पंढरपूर-मंगळवेढ्यात येऊन गल्लोगल्लीत फिरावं लागत आहे. फारशा महत्त्वाच्या नसलेल्या लोकांच्या भेटीगाठी घ्याव्या लागत आहेत. हा अजित पवारांचा स्वभाव नाही, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला. मला चंपा म्हणणं बंद करा. अन्यथा मग मीदेखील पार्थ पवार आणि इतरांचे शॉर्टफॉर्म सांगेन, असा इशारा त्यांनी दिला.

"राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित आणि तो कसा होणार ते अजित पवारांना माहित्येय"

'अजित पवारांना काय झालंय माहीत नाही. ते अलीकडे जरा जास्तच जोरात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मी पीएचडी करणार असल्याचं म्हटलं होतं आता मी अजित पवारांवर एम. फिल. करणार आहे. कारण इतकं सगळं करूनही ते छातीठोकपणे बोलत आहेत. त्यांची सिंचन प्रकरणी चौकशी सुरू आहे. बँक घोटाळा प्रकरणात त्यांचं नाव आहे. राज्यातले अनेक साखर कारखाने अडचणीत येतात आणि अजित पवार ते खरेदी करतात. अजित पवारांचे नेमके किती साखर कारखाने आहेत, हे त्यांनी एकदा सांगावं,' असं पाटील म्हणाले.

 

English summary :
NCP Clyde Crasto Slams BJP Chandrakant Patil Over Ajit Pawar And Thackeray Government Statement

Web Title: NCP Clyde Crasto Slams BJP Chandrakant Patil Over Ajit Pawar And Thackeray Government Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.