कर्नाटक : नव्या सरकारमध्ये असतील दोन उपमुख्यमंत्री? नवीन चेहऱ्यांना मिळू शकते संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 11:28 PM2021-07-26T23:28:40+5:302021-07-26T23:29:21+5:30

karnataka : मिळालेल्या माहितीनुसार, बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना आता नवीन सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार नाही.

karnataka bs yediyurappa new govt cabinet new face two deputy cm bjp | कर्नाटक : नव्या सरकारमध्ये असतील दोन उपमुख्यमंत्री? नवीन चेहऱ्यांना मिळू शकते संधी

कर्नाटक : नव्या सरकारमध्ये असतील दोन उपमुख्यमंत्री? नवीन चेहऱ्यांना मिळू शकते संधी

Next

बंगळुरू : कर्नाटकात राजकीय पेच निर्माण झाला आहे. बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर सोमवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेविषयी चर्चा सुरू झाली आहे. तसेच, आता नवीन मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा राज्यात रंगली आहे. नव्या सरकारमध्ये येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या अनेक वरिष्ठ नेत्यांची सुट्टी होणार असल्याचीही चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना आता नवीन सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार नाही. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेतृत्व मंत्रिमंडळात नवीन चेहर्‍यांना संधी देण्याचा प्रयत्न करीत आहे, असे म्हटले जात आहे. तसेच, यूपीच्या धर्तीवर कर्नाटकात नवीन स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये भाजपा दोन उपमुख्यमंत्री बनविण्याचा प्रयोग करू शकते. 

कर्नाटकात येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री बनविले जाऊ शकतात. यामधील एक एसटी समाजातील आमदार असू शकतो. विशेष म्हणजे येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत भाजपाच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कर्नाटक भाजपाचे प्रभारी अरुण सिंह यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अरुण सिंह यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून कर्नाटकला पाठवण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

लिंगायत समाजाचा प्रभाव
येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे आहेत. हा समाज १९९० पासून भाजपाचा समर्थक आहे. कर्नाटकमध्ये लिंगायत समाज १७ टक्के आहे. विधानसभेच्या २२४ पैकी जवळपास ९० ते १०० जागांवर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. यामुळे नवीन मुख्यमंत्री निवडताना भाजपालाही या समाजातून नेतृत्व देणे भाग आहे.

लिंगायत समाज मठांच्या प्रमुखांना भाजपाला इशारा
दुसरीकडे, कर्नाटकातील सर्वाधिक प्रभावी लिंगायत समाज मठांच्या प्रमुखांनी येडियुरप्पांना हटवण्याचा निर्णय हा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. भाजपाला याच्या विपरित परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा लिंगायत समाज मठांच्या प्रमुखांनी दिला आहे. 
कर्नाटकमध्ये निवडणूक कशी होते आणि कशी जिंकली जाते? हे दिल्लीतील नेत्यांना माहिती नाही. हे सरकार येडियुरप्पांनी बनवले आहे. यामुळे त्यांना हटवणे भाजपासाठी त्रासदायक ठरणारे आहे, असे लिंगेश्वर मंदिराचे मठाधीश शरण बसवलिंग म्हणाले. दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे २०१३ मध्ये येडियुरप्पा यांना भाजपाने हटवले होते. यामुळे भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ फक्त ४० जागांवर आले होते.

Web Title: karnataka bs yediyurappa new govt cabinet new face two deputy cm bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app