Former BJP MP Jaysinghrao gaikwad Joined NCP Presence of Sharad Pawar, Ajit Pawar | पंकजा मुंडेंच्या गडाला राष्ट्रवादीचा सुरुंग; माजी खासदारानं हातावर घड्याळ बांधलं, भाजपाला धक्का

पंकजा मुंडेंच्या गडाला राष्ट्रवादीचा सुरुंग; माजी खासदारानं हातावर घड्याळ बांधलं, भाजपाला धक्का

ठळक मुद्देसर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत राहिला. सत्ता ही विनम्रपणे सांभाळायची असते हे त्यांनी केलंदेशात असा एकमेव खासदार असेल जो कधी घरी गेला नाही. तर मतदारसंघात फिरत राहिला. महाराष्ट्रात ३० वर्षे बीड जिल्हा बघतोय. एक चांगला सहकारी आपल्यात आला आहे - पवार

मुंबई – एकनाथ खडसेंपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपाला आणखी एक धक्का दिला आहे, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले जयसिंगराव गायकवाड यांनी अखेर राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं आहे, त्यामुळे पंकजा मुंडेच्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीने सुरुंग लावल्याचं बोललं जात आहे, भाजपात कामाची कदर नाही, कौतुक नाही. चांगल्या कार्यकर्त्यांचे वाळवंट करण्याचे काम भाजपाने केल्याचा आरोप जयसिंगराव गायकवाड यांनी केला. जिथे कोंडमारा होतोय त्या पक्षात रहायचं नाही ठरवलं आणि आता राष्ट्रवादीत प्रवेश करुन मोकळा श्वास घेत असल्याचंही त्यांनी सांगितले.

यावेळी जयसिंगराव गायकवाड म्हणाले की, महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना साथ देवून रेकॉर्ड ब्रेक मतदान मिळवून देणार आहे. जी जबाबदारी द्याल ती प्रामाणिकपणे पार पाडेन. आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे असं म्हणाले तर महाराष्ट्रात ३० वर्षे बीड जिल्हा बघतोय. एक चांगला सहकारी आपल्यात आला आहे. सार्वजनिक जीवनात आदर्श कसा ठेवावा हे कळते. जयसिंगराव गायकवाड जिथे गेले होते तिथे त्यांचं मन रमलं नाही.  देशात असा एकमेव खासदार असेल जो कधी घरी गेला नाही. तर मतदारसंघात फिरत राहिला. सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत राहिला. सत्ता ही विनम्रपणे सांभाळायची असते हे त्यांनी केलं. त्यांचे पक्षात स्वागत आहे अशा शब्दात शरद पवारांनी जयसिंगराव गायकवाड यांचे कौतुक केले.

त्याचसोबत राष्ट्रवादीचा प्रतिनिधी सर्वांना घेऊन काम करत आहे. अनेक संकटात जनतेच्या खांद्याला खांदा लावून सरकार व लोकप्रतिनिधी काम करत आहेत, ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत घडत असल्याचं आज टिव्हीवर पहायला मिळत आहे. राज्य सरकार सर्वांवर मात करुन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आघाडीचे निर्णय महत्वाचे ठरत आहेत असेही शरद पवार म्हणाले.

राज्य वेगळ्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न

राज्यात वेगळ्या पद्धतीने राज्य चालवण्याचा‌ प्रयत्न आम्ही करतोय. तिन्ही पक्षाच्या आघाडीकडून वर्षभर चांगलं सरकार चालवण्याचा आमचा‌ प्रयत्न राहिला असून संकटं आली, कधी अतिवृष्टी झाली तरीही सरकार सामान्य माणसाच्या पाठीमागे उभे राहिले असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. रोगराईचे आज संकट आहे. संकट सुरुवात होण्याआधी प्रदेशाध्यक्ष यांनी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले ते काम थांबले परंतु कोरोना संपल्यानंतर तेच काम जोमाने सुरू होईल. आम्ही शेवटच्या माणसासाठी काम करतोय हे चित्र लवकरच दिसेल. हे आमचं कुटुंब आहे. आणि कुटुंब म्हणून आम्ही काम करतोय. लोकांच्या भल्यासाठी सरकार काम करत आहे राष्ट्रवादीचा प्रतिनिधी सर्वांना घेऊन काम करत आहे. अनेक संकटात जनतेच्या खांद्याला खांदा लावून सरकार व लोकप्रतिनिधी काम करत असल्याची पोचपावती शरद पवार यांनी दिली.

विकासाच्या प्रश्नासाठी इथून पुढे आपल्याला सहकार्य करु - अजित पवार

इथून पुढच्या काळात विकासाचे प्रश्न पुढे नेण्यासाठी आपल्याला सहकार्य करु असं आश्वासन देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयसिंगराव गायकवाड यांचे पक्षात स्वागत केले. भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश झाला आता जयसिंगराव गायकवाड यांचा पक्षप्रवेश होत आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचं काम यशवंतराव चव्हाणसाहेबांनी केले तेच काम पुढे पवारसाहेब करत आहेत. मराठवाड्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा फायदा होणार आहे हेही अजित पवार यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रासारखी ताकद मराठवाड्यात निर्माण करु - धनंजय मुंडे

पश्चिम महाराष्ट्रात जशी ताकद राष्ट्रवादीची आहे त्याच ताकदीची राष्ट्रवादी मराठवाडयात जयसिंगराव गायकवाड यांच्या प्रवेशाने निर्माण होईल असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. मला मनापासून आनंद आहे. काकांच्या प्रवेशाने बीड जिल्हयात व मराठवाडयात हत्तीचं बळ मिळाले आहे असं धनंजय मुंडे म्हणाले.

Web Title: Former BJP MP Jaysinghrao gaikwad Joined NCP Presence of Sharad Pawar, Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.