Cracks in BJP's fort in Pune; NCP's Arun Lad wins in Padavidhar constituency | पुण्यात भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार; राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी

पुण्यात भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार; राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी

पुणे : यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत पुणे पदवीधर मतदार संघात पहायला मिळाली. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला मोठे खिंडार पाडले आहे. 


पुणे पदवीधर मतदार संघात पहिल्याच पसंती क्रमांकाची तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते घेऊन , महा विकास आघाडीचे अरुण गणपती लाड विजयी झाले आहेत. त्यांनी 48 हजार 824 मतांनी बीजेपीचे संग्राम देशमुख यांचा  पराभव केला आहे. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली.
       पदवीधर करिता २ लाख 47 हजार 50 इतके मतदान झले होते. एकूण मतदानाच्या तुलनेत ही टक्केवारी 57. 96 टक्के इतकी होती. गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. मतमोजणीत यापैकी 2 लाख 28 हजार 272 हे वैध मतदान ठरले. त्यामुळे विजयी उमेदवारास 1 लाख 14 हजार 137 हा विजयी कोटा ठरविण्यात आला. एकूण 112 टेबल वर ही मतमोजणी सुरू होती. अपेक्षेप्रमाणे ही मतमोजणी शुक्रवारी सायंकाळपर्यंत चालेल असे बोलले जात होते. मात्र पहिल्याच पसंती क्रमांकात लाड यांनी तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळवून आपला विजय निश्चित केला. पदवीधर निवडणूक च्या निकषानुसार वैध मतांच्या 50 टक्के अधिक 1 अशी मते लाड यांनी मिळविल्याने शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास लाड यांचा विजय निश्चित झाला आहे. सकाळी 10 वाजता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक अधिकारी यांच्याकडून त्यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले जाईल. 


तर शिक्षक मतदारसंघात प्रा. जयंत आसगावकर यांची विजयाकडे घोड़ दौड सुरू; अधिकृत निकाल दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. 


नागपूरमध्येही महाविकास आघाडी जिंकली
विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत पाचही फेऱ्यांत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर होते. हीच आघाडी कायम राहिली आणि भाजपाच्या जोशी यांना मोठ्या मतफरकाने पराभव पत्करावा लागला. 

 

गेल्यावेळी लाड यांच्या बंडखोरीचा राष्ट्रवादीला फटका

पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून आले होते, पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र तेव्हाच्या निवडणुकीत सांगलीच्या अरूण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. यानिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना ६२ हजारांच्या आसपास मतदान झाले होते, तर सारंग पाटील यांना ५९ हजारांच्या वर मतदान झाले, अवघ्या २ हजारांच्या फरकाने भाजपाने ही जागा राखली होती, यात विशेषत: अरूण लाड यांनी घेतलेली २५ हजारांहून अधिक मते लक्षणीय होती, त्यामुळे लाड यांच्या बंडखोरीचा फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर मतदारसंघात निसटता पराभव सहन करावा लागला होता.

३० वर्षांपासून भाजपाचा दबदबा

गेल्या ३० वर्षांत पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. २००२ ला जनता दलाचे प्रा. शरद पाटील यांचा अपवाद वगळता २४ वर्षे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच प्रतिनिधित्व केले. मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादीमध्ये निकराची झुंज झाली आणि चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. यात अरूण लाड यांच्या बंडखोरीचा फटका पक्षाला बसला

Web Title: Cracks in BJP's fort in Pune; NCP's Arun Lad wins in Padavidhar constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.