"हल्ली CBI कुणाच्या आदेशांनुसार चौकशी करते हे भाजपाने दाखवून दिलं"; सचिन सावंतांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 22:19 IST2021-06-30T22:15:57+5:302021-06-30T22:19:21+5:30
Congress Sachin Sawant And BJP Chandrakant Patil : काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावरून चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

"हल्ली CBI कुणाच्या आदेशांनुसार चौकशी करते हे भाजपाने दाखवून दिलं"; सचिन सावंतांचा घणाघात
मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव मंजूर केल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहेत. सीबीआयतर्फे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा ठराव केला होता. प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण ही मागणी करत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी यावरून चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच भाजपावर बोचरी टीका केली आहे. "हल्ली सीबीआय कुणाच्या मार्गदर्शन आणि आदेशांनुसार चौकशी करते, हे भाजपाने दर्शवून दिले" असं म्हणत निशाणा साधला आहे. सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "राज्यांशी संबंधित विषयांवर सीबीआय चौकशी राज्य सरकार किंवा उच्च न्यायालय निर्देशित करते. पण वस्तुत: हल्ली सीबीआय कुणाच्या मार्गदर्शन आणि आदेशांनुसार चौकशी करते, हे भाजपाने दर्शवून दिले आहे. त्याबद्दल भाजपाचे धन्यवाद. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये याच कारणामुळे सीबीआय चौकशीवर बंदी घातली आहे" असं सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे सातत्यानं उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेनं वसुलीचा आरोप केला. परमबीरसिंग यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी ही कार्यकारिणी करत आहे, असा ठराव भाजप कार्यकारणीत मांडला होता.
अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा; चंद्रकांत पाटलांचं थेट अमित शहांना पत्र
आधी भाजप कार्यकारिणी अजित पवारांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली आणि आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी थेट अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप राष्ट्रवादी विरोधात संघर्ष करायच्या तयारीत दिसत आहे. 2014 पूर्वी भाजप सत्तेत असताना सिंचन घोटाळ्यावरून भाजपनं अजित पवारांविरोधात रान उठवलं होतं. मात्र 2019 मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सत्तासंघर्ष ऐन भरात असताना देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे राजभवनात अजित पवारांसह मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
"सरकार अशी लुबाडणूक करत असेल तर आमच्यासारख्या गरीब मुलांनी काय करायचं?"#MNS#SandeepDeshpande#ThackerayGovernment#Video#coronavirus#Mumbaihttps://t.co/IJXNIJvSy7pic.twitter.com/lE6FBXr50b
— Lokmat (@MiLOKMAT) June 27, 2021