Congress Rahul Gandhi slams Modi Government over farmers protest | "झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध" 

"झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध" 

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा. अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सरकार व शेतकरी नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी बुधवारी (2 डिसेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार असं सांगितलं गेलं. पण मित्रांचं उत्पन्न चौपट केलं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न अर्ध होणार. खोटं बोलणारं, लूटणारं आणि सूट-बूट वालं हे सरकार आहे" असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक व्हिडीओ देखील शेअर करत सरकारवर जोरदार निशाणा साधला.

मोदींनी शेतकऱ्यांचं नव्हे, अदानी आणि अंबानींचं उत्पन्न दुप्पट केलं: राहुल गांधी

राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन याआधीही अनेकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांनी उत्पन्न दुप्पट केलं हे खरं आहे. पण शेतकऱ्यांचं नव्हे, तर अदानी आणि अंबानी यांचं उत्पन्न दुप्पट केलं", अशी घणाघाती टीका राहुल यांनी केली होती. यासोबतच जे लोक हे काळे कृषी कायदे कसे योग्य आहेत अशीच दवंडी पिटत आहेत ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काय तोडगा काढणार?, असं म्हणत राहुल यांनी सरकारच्या चर्चेच्या प्रस्तावावर टीका केली होती. 

जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीतून उतरुन विचार करा; राहुल यांचा मोदींवर निशाणा

नव्या कृषी कायद्यांवरुन दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला असून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून ट्विटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन पंतप्रधानांना लक्ष्य करत आहेत. आज पुन्हा एकदा राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. "जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीतून उतरुन विचार करा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्या'', असं राहुल यांनी म्हटलं आहे. 

शेतकरी नेते म्हणाले, "गोळी किंवा शांततापूर्ण समाधान, सरकारकडून नक्कीच काहीतरी परत घेऊ"

मंगळवारी केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत सहभागी झालेले शेतकरी नेते चंदा सिंग म्हणाले, "कृषी कायद्याविरूद्ध आमचे आंदोलन सुरूच राहील. आम्ही सरकारकडून काहीतरी परत घेऊ, मग ती बुलेट असो किंवा शांततापूर्ण समाधान." तसेच, आम्ही पुन्हा चर्चेसाठी येऊ, असे चंदा सिंग यांनी सांगितले. याचबरोबर, अखिल भारतीय शेतकरी महासंघाचे अध्यक्ष प्रेमसिंह म्हणाले, "आजची बैठक चांगली झाली. ३ डिसेंबर रोजी सरकारबरोबर पुढच्या बैठकीत आम्ही त्यांना समजावू सांगू की कोणताही शेतकरी कृषी कायद्याचे समर्थन करत नाही. आमचे आंदोलन सुरूच राहील."

Web Title: Congress Rahul Gandhi slams Modi Government over farmers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.