congress rahul gandhi slams bjp and yogi government over Balrampur Horror | "बेटी बचाओ नाही तर 'तथ्य लपवा, सत्ता वाचवा' हीच भाजपाची घोषणा"

"बेटी बचाओ नाही तर 'तथ्य लपवा, सत्ता वाचवा' हीच भाजपाची घोषणा"

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभर संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनी उत्तर प्रदेशातील सरकारवर जोरदार टीका केली आहे. यानंतर बलरामपूरमध्ये ही एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपा आणि योगी सरकारवर निशाणा साधला आहे. "बेटी बचाओ नाही तर 'तथ्य लपवा, सत्ता वाचवा' हीच भाजपाची घोषणा" असं म्हणत राहुल यांनी हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केले आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. "उत्तर प्रदेशच्या जंगलराजमध्ये मुलींवर अत्याचार आणि सरकारची दडपशाही सुरू आहे. जिवंत असताना कधी त्यांना सन्मान दिला नाही आणि मृत्यूनंतरही त्यांच्या अंत्यसंस्काराचा अधिकार दिला नाही. बेटी बचाओ नाही तर 'तथ्य लपवा, सत्ता वाचवा' हीच भाजपाची घोषणा आहे" असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसेच Balrampur Horror असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

"उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजने आणखी एका तरुणीला मारलं"

"उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारून टाकलं" असं म्हणत राहुल गांधींनी याआधी जोरदार टीका केली होती. "सरकारने म्हटलं की फेक न्यूज आहे आणि पीडितेस मरण्यासाठी सोडून दिलं. मात्र ही दुर्देवी घटना खोटी नव्हती, पीडितेचा मृत्यूही आणि सरकारचा निर्दयीपणा देखील खोटा नव्हता" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. तसेच प्रियंका गांधी यांनी देखील योगी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील कायदे व्यवस्था बिघडल्याचं म्हटलं होतं. 

"तो आदेश कोणी दिला?, कधीपर्यंत हेच चालत राहणार?, तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात?", प्रियंका गांधींचा घणाघात

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागितला आहे. यानंतर पुन्हा एकदा प्रियंका यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी यांनी हाथरस घटनेसंदर्भात योगी आदित्यनाथ यांना काही प्रश्न विचारले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. "मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारू इच्छिते… कुटुंबीयांकडून जबरदस्तीने हिसकावून घेत पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा आदेश कोणी दिला?, मागील 14 दिवसांपासून तुम्ही कुठे झोपला होतात? कार्यवाही का केली नाही? कधीपर्यंत हेच चालत राहणार? तुम्ही कसे मुख्यमंत्री आहात?" असं म्हणत प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. 

"भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा" 

काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "भारतमातेच्या मुलीची बलात्कार करून हत्या, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा" असं काँग्रेसने म्हटलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. "भारतमातेच्या एका मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. दहा दिवसांनंतरही तक्रार दाखल केली नाही. तिला दिल्लीतील रुग्णालयात पोहोचवण्यास उशीर केला आणि पोलिसांनी मृतदेहावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले. याला जंगलराज म्हणतात. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा" असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. 

English summary :
congress rahul gandhi slams bjp and yogi government over Balrampur Horror

Web Title: congress rahul gandhi slams bjp and yogi government over Balrampur Horror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.