राज्यात 'ऑपरेशन लोटस' होणार?; फडणवीसांच्या 'त्या' विधानानं चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 03:30 AM2021-02-07T03:30:51+5:302021-02-07T07:41:18+5:30

महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत, तरीही अध्यक्ष निवडीची उत्सुकता

bjp might surprise maha vikas aghadi in assembly speaker election amp | राज्यात 'ऑपरेशन लोटस' होणार?; फडणवीसांच्या 'त्या' विधानानं चर्चेला उधाण

राज्यात 'ऑपरेशन लोटस' होणार?; फडणवीसांच्या 'त्या' विधानानं चर्चेला उधाण

Next

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडे भक्कम बहुमत असल्याने नाना पटोले यांच्या जागी नवीन अध्यक्ष निवडताना कुठलीही अडचण येणार नाही असे चित्र असले तरी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे या निवडणुकीत काही वेगळे होईल का, याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले होते. तेव्हा या सरकारने १६९ मते घेत विधानसभेत बहुमत सिद्ध केले होते. पटोले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. पटोेले यांच्या जागी आता नवे अध्यक्ष निवडताना हे पद काँग्रेसकडे जाणार हे निश्चित मानले जाते. पटोले यांनी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ असताना राजीनामा द्यायला नको होता, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले होते.

‘आम्ही कोणतीही शिडी न वापरता फासे पलटू शकतो’ असे विधान एका कार्यक्रमात फडणवीस यांनी केल्याने विधानसभाध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने ‘ऑपरेशन कमळ’ होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी रविवारी सिंधुदुर्गात आहेत. शहा यांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार पडावे, असे विधान राणे यांनी शनिवारी केले. मात्र, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मजबुतीने एकत्र आहेत आणि अध्यक्षपदाची निवडणूक अगदी सोपी असल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत म्हणाले की, फासे सगळ्यांनाच टाकता येतात. फडणवीस यांनी वर्षभर बरेच फासे टाकून पाहिले पण सरकार स्थिर आहे. त्यांचे फासे गुळगुळीत झाले आहेत.

शिवसेनेच्या मुखपत्रात मात्र काँग्रेसला पाच वर्षांसाठी अध्यक्षपद दिलेले होते, एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचा अधिकार; पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल, असे म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षपदाचे काय करावे यावर तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, या शरद पवार यांच्या वक्तव्याची आठवणही मुखपत्रात करून देण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार - कदम
सांगली : महाविकास आघाडीची स्थापना झाली, त्यावेळच्या चर्चेनुसार विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्यात आले आहे. त्यामुळे यापुढेही ते काँग्रेसकडेच राहील, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

कदम म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना त्यावेळी कोणते पद कोणाकडे राहणार, याची सविस्तर चर्चा झाली होती. त्यावेळच्या तडजोडीनुसार हे पद काँग्रेसला मिळाले. त्यामुळे आता यावर पुन्हा चर्चा करण्यात काही अर्थ नाही. हे पद काँग्रेसकडेच राहील. याबाबत आणखी कोणत्या घटक पक्षाचे काही वेगळे मत असेल तर त्यावर पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील.

 नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यानुसार दिला आहे. त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने विधानसभा अध्यक्षपदाबाबत आता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

भाजपचा देशात हुकूमशाही कारभार
केंद्र सरकारच्या धोरणांबद्दल कदम म्हणाले, भाजपने संपूर्ण देशात हुकूमशाही कारभार सुरू केला आहे. कोणाचेही म्हणणे ऐकून घेण्यास ते तयार नाहीत. त्यांनी गोरगरीब जनता, शेतकरी व अन्य घटकांचा विचार केला नाही तर येणारा काळ त्यांना माफ करणार नाही.

Web Title: bjp might surprise maha vikas aghadi in assembly speaker election amp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.