"ज्यांचं आयुष्य गांधी घराण्याच्या दबावाखाली गेलं त्या काँग्रेसला..."; केशव उपाध्ये यांचा जोरदार निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 19:59 IST2021-02-08T19:55:08+5:302021-02-08T19:59:42+5:30
Tweet Inquiry : बालिश मागणीला गृहमंत्र्यांकडून होकार मिळणं दुर्देवी, उपाध्ये यांचं वक्तव्य

"ज्यांचं आयुष्य गांधी घराण्याच्या दबावाखाली गेलं त्या काँग्रेसला..."; केशव उपाध्ये यांचा जोरदार निशाणा
केंद्र सरकारनं केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना, ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा यांनी पाठिंबा देणारं ट्वीट केलं होतं. त्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार यासारख्या सेलिब्रिटींनी ट्वीट करत तिला प्रत्युत्तर दिले होते. या सर्व सेलिब्रिटींच्या ट्वीटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्यानं याची चौकशी करण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. यानंतर अनेक स्तरातून याचा विरोध करण्यात येत आहे. भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार टीका केली.
"सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांसारख्या भारतरत्नांची चौकशी करण्याचा आदेश देणे म्हणजे सरळ सरळ पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे. ज्यांचं आयुष्य गांधी घराण्याच्या दबावाखाली गेलं त्या काँग्रेसला सगळेच दबावाखाली असतात असं वाटणं स्वाभाविक आहे. पण या बालिश मागणीला गृहमंत्री होकार देतात ते दुर्दैवी आहे," असं म्हणता उपाध्ये यांनी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला.
@sachin_rt@mangeshkarlata यासारख्या भारतरत्नची चौकशी करण्याचा आदेश देणे म्हणजे सरळ सरळ पोलिस यंत्रणेचा गैरवापर आहे. ज्यांच आयुष्य गांधी घराण्याच्या दबावाखाली गेल त्या कॅाग्रेसला सगळेच दबावाखाली असतात अस वाटण स्वाभाविक आहे पण या बालिश मागणीला गृहमंत्री होकार देतात ते दुर्दैवी आहे
— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 8, 2021
सचिन सावंतांकडून मागणी
दरम्यान, आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटींच्या ट्वीटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचे कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली होती.
यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, ही बाब गंभीर आहे. त्याचा तपास झाला पाहिजे. याबाबतची जबाबदारी गुप्तचर खात्याला दिली आहे. तसंच, सर्व सेलिब्रिटींचे ट्वीट एकसारखे कसे काय असू शकतात. त्यांच्यावर कुठला दबाव होता का? असा सवालही अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार शेतकरी आंदोलनाबाबत भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्याची शक्यता आहे.