BJP candidate out from Counting; Signs of a shocking victory in Amravati Vidhan Parishad | भाजपाच्या उमेदवारावर बाद होण्याची वेळ; अमरावतीत धक्कादायक विजयाचे संकेत

भाजपाच्या उमेदवारावर बाद होण्याची वेळ; अमरावतीत धक्कादायक विजयाचे संकेत

अमरावती/ मुंबई : विधान परिषदेची पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमधील निवडणुकीचे निकाल धक्कादायक असले तरीही अमरावतीने शिवसेना आणि भाजपावर मोठी नामुष्कीची वेळ आणली आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना लढवत असलेली एकच जागा निवडून आणता आलेली नाही. तर दुसरीकडे भाजपाच्या उमेदवारावर बाद होण्याची वेळ आली आहे. 


अमरावतीमध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु आहे. यामध्ये भाजपाचा उमेदवार सहाव्या क्रमांकावर फेकला गेल्याने बाद ठरविण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काही वेळापूर्वीच शिवसेनेला डिवचताना ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही, आमचा एक तरी आला, असा टोला हाणला होता. तो याच अमरावतीच्या जागेवरून होता. मात्र, आता भाजपाचा उमेदवारच शर्यतीतून बाद झाल्याने खळबळ उडाली आहे. 

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत एकूण ३०९१८ मतदान झाले. यापैकी २९८२९ मते वैध ठरली. तर सध्या आघाडीवर असलेले अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना ८०८९ मते मिळाली आहेत. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीची २२ वी फेरी संपली असून शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ६४५५ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार  शेखर भोयर यांना ५९२८ मते मिळाली असून अन्य दोन अपक्षांनी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर मजल मारली आहे. भाजपाचा उमेदवार सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. 


भाजपचे उमेदवार नितीन धांडे २२ व्या फेरीत बाद झाले असून त्यांना एकूण मते २५२९ मिळाली आहेत. 

सहापैकी चार पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचे निकाल लागले असून काँग्रेस, राष्ट्रवादीला तीन जागांवर विजय मिळाला आहे. तर एका जागेवर निकालाची प्रतिक्षा आहे. विरोधी पक्ष ठरलेल्या भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपाचे अमरीश पटेल जिंकले आहेत. तर औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, पुणे पदवीधरमध्ये अरुण लाड विजयी झाले आहेत. 


पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर असून अद्याप निकाल लागायचा आहे. दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर नागपूर नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसच्या ॲड. अभिजित वंजारी यांनी दणदणीत विजय मिळविल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. 

Web Title: BJP candidate out from Counting; Signs of a shocking victory in Amravati Vidhan Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.