BJP Atul Bhatkhalkar Target NCP Sharad Pawar over Dhananjay Munde Rape Allegation | “शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्रातील जनता बघतेय; राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

“शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्रातील जनता बघतेय; राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

ठळक मुद्देवेगळ्या विचारांचे, वेगळ्या भूमिकेचे लोकही एकाच महिलेबद्दल बोलत आहेत. आता हे प्रकरण पोलिसांकडे आहे. संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईलती राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, भाजपा आमदाराचा टोला

मुंबई – बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात विरोधकांनी रान उठवलं आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला आघाडी राज्यभरात आंदोलन करणार आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात सावध भूमिका घेतल्याने भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

याबाबत अतुल भातखळकर म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत तेव्हा त्याची चौकशी करून निर्णय घेऊ असं आधी म्हणायचं आणि नंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असं म्हणून पाठीशी घालायचं हा शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून ती राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना लगावला आहे.

एका आठवड्यात चौकशी करा – गृहमंत्री

शुक्रवारी या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक, ज्योत्स्ना  रासम यांची बैठक घेतली,यात एका आठवड्यात धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी करावी अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मुंबई पोलीस सहा आठवड्यांच्या चौकशीनंतर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी पूर्ण व्हावी असं मत गृहमंत्र्यांनी मांडलं. त्यामुळे आणखी एक आठवडा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

आम्ही धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाबाबत चर्चा केली आहे, त्याचसोबत त्या महिलेवरही ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर आरोप झाले आहेत, वेगळ्या विचारांचे, वेगळ्या भूमिकेचे लोकही एकाच महिलेबद्दल बोलत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसीपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, असे आपण सुचवले आहे. आता हे प्रकरण पोलिसांकडे आहे. संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं शरद पवारांनी सांगितले.

तक्रारदार महिलेने काय केले आरोप?

'२००६ पासून चार-एक वर्ष सोडल्यास धनंजय मुंडेंनी माझा वापर केला. २०१३ पासून त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मला सांत्वना दाखवून, विश्वास देऊन केवळ माझा वापर करून घेतला. मला उद्ध्वस्त केलं. लग्नाचं वचन देऊन माझा वापर करून घेतला, असे खळबळजनक आरोप तक्रारदार महिलेनं केले, गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यावर अन्याय होत असताना गप्प का राहिलात, असा प्रश्न महिलेला विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ होते. ते व्हिडीओ कॉलवरही शरीर संबंधांची मागणी करायचे आणि त्यानंतर शरीरसंबंध ठेवायचे. त्यामुळे मी गप्प होते. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची माझी इच्छा होती. मी अतिशय महत्त्वाकांक्षी होते. त्याचाच मुंडेंनी गैरवापर केला. मी तुझ्या मागे खंबीरपणे उभा राहीन, असं आश्वासन देऊन त्यांनी माझा फक्त वापर केला, असा गंभीर आरोप महिलेनं केला आहे.

Web Title: BJP Atul Bhatkhalkar Target NCP Sharad Pawar over Dhananjay Munde Rape Allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.