BJP against Mahavikas Aghadi, Churshi match for Legislative Council; The guns of propaganda cooled | महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा, विधान परिषदेसाठी चुरशीचा सामना; प्रचाराच्या तोफा थंडावल्या

महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा, विधान परिषदेसाठी चुरशीचा सामना; प्रचाराच्या तोफा थंडावल्या

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच आघाडी विरुद्ध भाजप असा चुरशीचा सामना विधान परिषदेच्या  निवडणुकीत रंगला. आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्यानंतर प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या.  मतदान १ डिसेंबरला तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.

रविवारी शेवटच्या दिवशी प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचारासाठी जोर लावला. यासोबतच विविध राजकीय पक्षातील नेतेही शेवटच्या दिवशी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपने संग्राम देशमुख यांना मैदानात उतरविले आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने अरुण लाड यांना संधी दिली. संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे, मनसेच्या रुपाली पाटील हेही मैदानात आहेत. या मतदारसंघात चुरशीची लढत होत असून आघाडी आणि भाजप  नेत्यांनी ताकद पणाला लावली आहे. स्वत: शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह जयंत पाटील आदींनी मतदारसंघ पिंजून काढला. तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडणवीस यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. 

पुणे शिक्षक मतदारसंघातही रंगतदार लढत होत आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आली असून राष्ट्रवादीने जयंत आसगावकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून जितेंद्र पवार उभे आहेत. आसगावकर कोल्हापूरचे तर पवार सोलापूरचे आहेत.  विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. 

अमरावती मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे तर भाजपकडून नितीन धांडे निवडणूक लढवित आहेत. या शिवाय, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रकाश काळबांडे, शिक्षक महासंघाचे शेखर भोयर हेही आपले नशिब आजमावत आहेत. या मतदारसंघातही आघाडी विरुद्ध भाजप असाच सामना आहे.

मराठवाड्याकडे लक्ष 

  • मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण तर भाजपकडून शिरीष बोराळकर मैदानात आहेत. 
  • स्व. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक रमेश पोकळे यांनी बंडखोरी केल्याने चुरस वाढली आहे. सतीश चव्हाण यांच्यासाठी राष्ट्रवादीसह कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. 
  • आघाडीचे मान्यवर नेते प्रचारात उतरले होते. तर बोराळकर यांच्यासाठी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे पंकजा मुंडे आदी नेत्यांनी प्रचार केला. 

 

नागपुरात लढत बहुरंगी पण....

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार अनिल सोले यांचा पत्ता कट करून महापौर संदीप जोशी यांना मैदानात उतरविले. तर कॉंग्रेसने ॲड. अभिजीत वंजारी यांना उमेदवारी दिली. या दोघांशिवाय, वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे, विदर्भवादी चळवळीतील नितीन रोंगे, अपक्ष प्रा. प्रशांत डेकाटे,  अतुलकुमार खोब्रागडे हेही मैदानात आहेत. 

भाजपचा हा पारंपारिक मतदारसंघ असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर पहिल्यांदाच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. या मतदारसंघात लढत बहुरंगी असली तरी खरा सामना भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असाच आहे.

Web Title: BJP against Mahavikas Aghadi, Churshi match for Legislative Council; The guns of propaganda cooled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.