कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोश होत असतो, पण पंकजा मुंडें असे काही करणार नाहीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 13:00 IST2021-07-13T12:59:21+5:302021-07-13T13:00:35+5:30
ashish shelar reaction on pankaja munde: पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराज समर्थकांची वरळी निवासस्थानी बैठक बोलावली आहे.

कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोश होत असतो, पण पंकजा मुंडें असे काही करणार नाहीत...
कोल्हापूर: केंद्रीय मंत्रिमंडळात खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचा समावेश न केल्यामुळे बीड जिल्हा भाजपत असंतोष पसरला आहे. जिल्ह्यातून अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपल्या पदाचे राजीनामे पाठविले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंडे भगिनी मुंबईत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, मुंडेच्या नाराजीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठे विधान केले आहे.
आशिष शेलार आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कोल्हापुरात माध्यमांशी बोलत असताना त्यांनी पंकजा मुंडेचे कोणतेही दबाव तंत्र नाही. त्या कधीच असे करणार नाहीत, असे मत व्यक्त केले आहे. तसेच, कधी कार्यकर्त्यांच्या भावनाचा आक्रोश होतो. त्याला काही पक्ष द्रोह मानण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.
नाना पटोलेंच्या विधानावर टीका
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर पाळत ठेवत असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना शेलार म्हणाले की, नाना पटोले कधीच आपल्या विधानावर ठाम राहत नाहीत. ते नेहमीच विधान बदलतात. आधी फोन टॅपिंगबद्दल बोलले, त्यानंतर मुंबईवरून ते लोणावळ्यात आले आणि हवामान बदलल्याप्रमाणे त्यांचे वक्तव्य बदलले. तिकडे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. पुन्हा हवामान बदललं तर पुन्हा केंद्र सरकारकडे बोट दाखवतील. जो माणूस स्वत: च्या विधानावर टिकू शकत नाही. त्याची केस काय टिकणार?, असा खोचक टोला त्यांनी लगावला.