सोशल मीडियावर निराशाजनक स्टेटस ठेवून हिंजवडीत तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 13:14 IST2019-07-29T13:11:18+5:302019-07-29T13:14:55+5:30
कामाच्या अनिश्चिततेमुळे नैराश्य आल्याने तरुणाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

सोशल मीडियावर निराशाजनक स्टेटस ठेवून हिंजवडीत तरुणाची आत्महत्या
हिंजवडी : सोशल मीडियावर निराशाजनक स्टेटस ठेवून तरुणाने कंपनीच्या आवारातील लोखंडी जिन्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी आयटी पार्कमधील फेज दोन येथे ही घटना घडली. शनिवारी (दि. २७) सकाळी सहा वाजता एमक्यूअर कंपनीच्या आवारात हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदरराज शाहूराज गोरटे (वय ३२, रा. गणेश कॉलनी, भुमकर चौक, वाकड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मेघराज गोरटे (वय २२) यांनी हिंजवडी पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंध रुग्णालयात पाठविला होता. आत्महत्या केलेला तरुण एमक्यूअर कंपनीत कामाला होता. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र सोशल मीडियावर निराशाजनक स्टेटस अपलोड करून कामाच्या अनिश्चिततेमुळे नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज हिंजवडी पोलिसांनी व्यक्त केला आहे.