पिंपरी : दुचाकीवरून जाताना रस्त्यावर लोंबकळत असलेल्या इंटरनेट-केबल वायरमध्ये गळा अडकल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मंगळवारी (दि.२८) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे महापालिकेच्या निष्काळजी कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. संपदा संदीप पटवर्धन (वय ४८, रा. प्राधिकरण, निगडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
पटवर्धन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातील महिला विभागाच्या त्या खजिनदार होत्या. मंडळाचे सदस्य संदीप पटवर्धन यांच्या पत्नी होत. शुक्रवारी (दि.२४) सकाळी त्या नेहमीप्रमाणे घरातून स्कूटरवरून ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. प्रशिक्षण दिल्यानंतर त्या विद्यालयातून बाहेर पडल्या. तेथून जवळच असलेल्या दुर्गेश्वर पथ या रस्त्यावर लोंबळत असलेल्या केबल वायरमध्ये त्यांचा गळा अडकला. त्यामुळे त्या रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले. संपदा पटवर्धन यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. घटना घडल्यानंतरही चार दिवस ती केबल तिथे लोंबकळत होती, असे स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील अनेक भागांत इंटरनेट, वाय-फाय व डिशच्या केबल्स नियमबाह्य पद्धतीने टाकल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नाही. संपदा यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तक्रारींची दखल न घेतल्याने गेला जीव
निवडणुकीत मते मागणाऱ्यांना नागरिकांनी रस्त्यांवरील लोंबकळणाऱ्या केबल्स व भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबाबत वारंवार प्रश्न विचारले होते. हे कधी थांबणार?, असा सवालही करण्यात आला; मात्र या तक्रारींकडे दखल न घेतल्यानेच संपदा पटवर्धन यांचा बळी गेला आहे. त्यामुळे याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भारतीय स्त्री शक्ती जागरण संघटनेच्या सचिव मनाली जोशी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
Web Summary : A woman died after a cable wire accident in Pimpri. Sampada Patwardhan, 48, succumbed to injuries sustained when a loose cable caught her neck. Public outrage over municipal negligence is growing as similar hazards persist.
Web Summary : पिंपरी में केबल तार से दुर्घटना में एक महिला की मौत हो गई। संपदा पटवर्धन, 48, की ढीली केबल से गर्दन फंसने से लगी चोटों के कारण मौत हो गई। नगरपालिका की लापरवाही पर जनता का आक्रोश बढ़ रहा है क्योंकि इसी तरह के खतरे बने हुए हैं।