पवना धरण परिसरात पर्यटकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? दोन वर्षांत गेला ११ जणांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:47 IST2024-12-13T14:47:30+5:302024-12-13T14:47:40+5:30
दोन वर्षांत गेला ११ जणांचा जीव : प्रशासनाची टोलवाटोलवी

पवना धरण परिसरात पर्यटकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? दोन वर्षांत गेला ११ जणांचा जीव
पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात गेल्या आठवड्यात बोट पलटी होऊन दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भिजण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक धरणात उतरतात, परंतु खोलीचा अंदाज न आल्याने बुडतात. काही जण बोटीतून पाण्यात फिरण्याची मजा लुटत असतात. मात्र बोटमालक कोणतीही सुरक्षा न देता बोटी पाण्यात फिरवतात. त्यामुळे वाऱ्याच्या व लाटेच्या तडाख्यात बोट बुडाल्याच्या घटनाही घडत आहेत.
पवना धरण परिसरात २०२२ ते २०२४ दरम्यान ११ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. धरण क्षेत्रात पाच विनाइंधन नौकांना परवानगी आहे, मात्र सुमारे १५ ते २० इंधन बोटी आणि सुमारे ६० ते ७० विनाइंधन नौका बेकायदेशीरपणे धरणाच्या पाण्यात फिरताना दिसतात. यावर जलसंपदा विभागाचे अधिकारी गप्प आहेत. धरणामध्ये इंधन बोटीला परवानगी नसताना त्या राजरोस फिरत आहेत.
धरणाच्या जागेवर अतिक्रमण करून बंगले
धरण परिसरात संपादित जागेवर अनेक धनदांडग्यांनी बेकायदेशीरपणे टोलेजंग बंगले व फार्महाऊस बांधले आहेत. काही जण महिन्यातून किंवा वर्षातून एकदा वास्तव्यासाठी येत असतात. इतर वेळी हे फार्महाऊस व बंगले महिन्याकाठी काही रक्कम ठरवून भाडेतत्त्वावर दिले जात आहेत. विशेष म्हणजे याबाबत कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेकडे माहिती नाही. पर्यटकांची माहिती पोलिसांना न कळवता बंगले व फार्महाऊस भाड्याने दिले जातात.
पोलिसांची कारवाई घटना घडल्यावरच
धरण परिसरातील बंगले व फार्महाऊसवर पर्यटक भाडे देऊन राहण्यासाठी येत असतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी काही जण अमली पदार्थ, दारू, मावा यांची राजरोस विक्री करतात. यामधून एखादी दुर्घटना घडली तरच पोलिस कारवाईचे कागदी घोडे पुढे करत असतात.
सुरक्षारक्षक करतात काय?
परिसरात सुमारे २२ सुरक्षारक्षक आहेत. गेल्या वर्षभरात जलसंपदा विभागाने नवीन सुरक्षारक्षक घेतले असून त्यांच्यासमोर राजरोस चालणाऱ्या उद्योगांकडे दुर्लक्ष होत आहे.
डिसेंबर महिना सुरू झाला की धरण परिसरात पर्यटक येत असतात. परिसरात अनधिकृत बोटिंग मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्याकडे जॅकेट अथवा कोणत्याही सुरक्षा उपाययोजना नसतात. त्यामुळेच धरणात दरवर्षी पर्यटकांचा बुडून मृत्यू होत असतो. बोटमालकांनी पर्यटकांना सर्व सुविधा पुरवून बोट क्लब चालवावेत, नाही तर बंद करावेत. - नीलेश गराडे, संस्थापक, वन्यजीव रक्षक, मावळ
जलसंपदा विभाग अथवा पोलिसांकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. घटना घडल्यानंतर फक्त पंधरा दिवस कठोर नियम लावले जातात. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. - दत्तात्रय काजळे, माहिती अधिकार कार्यकर्ते
बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बोटी व नौका यामधील आठ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले असून, जलसंपदा विभागाला पत्रव्यवहार केला आहे. बेकायदेशीर बोटी व नौकाचालकांची नावे द्या, कारवाई करू. - किशोर धुमाळ, पोलिस निरीक्षक, लोणावळा
बेकायदेशीर व्यवसायांवर आमच्या विभागामार्फत कारवाई करण्यात येत आहे. मालमत्ता जप्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी असल्याने ते दूषित होऊ नये याची काळजी घ्यावी. - श्वेता कुराडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग