लेह-लडाख वरून परत येताना काळाचा घाला; पिंपरी-चिंचवडमधील तरुणांच्या कारचा राजस्थानमध्ये अपघात; तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 20:28 IST2026-03-18T20:28:19+5:302026-03-18T20:28:33+5:30
शहरातील काही तरुण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात फिरायला गेले. यातील ३ जण गेल्या आठवड्यात घरी परतले. उर्वरित मित्र राजस्थान येथून परत येत असताना हा अपघात झाला

लेह-लडाख वरून परत येताना काळाचा घाला; पिंपरी-चिंचवडमधील तरुणांच्या कारचा राजस्थानमध्ये अपघात; तिघांचा मृत्यू
पिंपरी : तीन कार घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील काही तरुण लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीरला फिरायला गेले होते. तेथून परत येत असताना बुधवारी (दि. १८ मार्च) राजस्थान येथील कोटा शहराजवळ त्यांच्या एका कारलाअपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला.
पिंपरी-चिंचवड शहरातील काही तरुण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात फिरायला गेले होते. यातील तिघे जण तब्बेत खराब झाल्याने गेल्या आठवड्यात घरी परतले. दरम्यान, उर्वरित सर्व मित्र बुधवारी राजस्थान येथून परत येत होते. त्यावेळी कोटा शहराजवळ महामार्गावर त्यांच्या एका कारला अपघात झाला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातामुळे शहरावर शोककळा पसरली. संबंधित तरुणांच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला असून राजस्थान येथे रवाना झाले आहेत.
गुरुवारी सकाळी आणणार मृतदेह
फिरायला गेलेल्या तरुणांच्या एका कारचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करून मदत केली. शवविच्छेदन झाले असून नातेवाईक तिथे पोहोचले आहेत. अपघाताची ही घटना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मतदारसंघात घडली आहे. त्यांच्या सचिवाशी माझी चर्चा झाली आहे. तिघांचे मृतदेह गुरुवारी (दि. १९ मार्च) शहरात आणण्यात येणार आहेत, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
आठ दिवसांपूर्वी लेहमध्ये अडकले होते
लेह-लडाखच्यामध्ये कारगिल येथे हे तरूण आठ दिवसांपूर्वी अडकले होते. बर्फवृष्टी झाल्याने रस्ते बंद होते. त्यामुळे पाच दिवस ते एकाच ठिकाणी अडकले होते. त्यांना कोठेही जाता येत नव्हते. त्यावेळीही त्यांचा फोन आला होता. बीएसएफच्या कमांडरशी संवाद साधून या तरुणांना तेथून सोडले होते, असेही खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.