निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही; अजित गव्हाणेंसह ३७ आजी-माजी नगरसेवकांची घरवापसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 10:09 IST2025-06-18T10:07:31+5:302025-06-18T10:09:58+5:30
जुना-नव्याचा वाद होऊ देऊ नका, आतापासूनच तयारीला लागा, महापालिका निवडणुकीला एकत्रित सामोरे जाऊ, अजित पवारांचा आदेश

निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही; अजित गव्हाणेंसह ३७ आजी-माजी नगरसेवकांची घरवापसी
पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याचा फटका आम्हाला लोकसभेत बसला. आता राष्ट्रवादीत येणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. जुना-नव्याचा वाद होऊ देऊ नका. निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही. महापालिका निवडणुकीला एकत्रित सामोरे जाऊ. आतापासूनच तयारीला लागा, असा आदेशच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा मंगळवारी (दि.१७) भोसरीत झाला. यावेळी शरद पवार गटातील अजित गव्हाणे, राहुल भोसले, डॉ. वैशाली घोडेकर, संजय वाबळे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, यश साने यांच्यासह ३७ आजी-माजी नगरसेवकांनी अजित पवार गटात प्रवेश केला. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, नाना काटे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, राजकारणात चढ-उतार येतात. न्यायालयातील याचिकांमुळे निवडणुकीला तीन वर्षे उशीर झाला. पिंपरी-चिंचवडमध्ये पवना बंदिस्त जलवाहिनीच्या प्रश्नांवर काहींनी स्वतःची पोळी भाजून घेतली आहे. आता न्यायालयानेही बंदिस्त जलवाहिनीतून पाणी घेण्यास सहमती दिली आहे. त्यामुळे काही अंशी शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. एमआयडीसीत अतिक्रमण, वाहतूक समस्या, पाणीटंचाई, गुन्हेगारी आदी समस्या आहेत. त्यावर काम करणे गरजेचे आहे.
डीपी, टीपीचा प्रश्न नवीन आयुक्तांसमोर मांडू
पवार म्हणाले की, राष्ट्रवादीची सत्ता असताना चिखली-कुदळवाडीत काम सुरू होते. मात्र, त्याला हवी तशी गती मिळाली नाही. चिखलीचा टीपी रद्द झाला. मात्र चऱ्होलीचा रद्द झाला नाही. चुकीची आरक्षणे पडली आहेत. बोऱ्हाडेवाडीतील आरक्षणाबद्दलही निर्णय घ्यावा, असे नागरिकांचे मत आहे. रेडझोन, टीडीआर संदर्भातील प्रश्न माझ्याकडे द्या. या आयुक्तांचा कार्यकाल संपत आला आहे. त्यांच्या जागी नवीन आयुक्त येतील. तुमचे प्रश्न घेऊन त्यांच्याशी बोलतो.
ताथवडेमध्ये ‘यशदा’चे ट्रेनिंग सेंटर
पवार म्हणाले की, ताथवडे येथील १२० एकर जागा ‘यशदा’चे ट्रेनिंग सेंटर करण्यासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे. शहरात रिंगरोडचे जाळे निर्माण होत असताना उपनगरीय लोहमार्गाचेही नियोजन आहे. तळेगाव-चाकण- शिक्रापूर-उरळी कांचन - बारामती असा लोहमार्ग भविष्यात करण्यात येणार आहे.
मोशीवर कचरा डेपो लादू नका : अजित गव्हाणे
अजित गव्हाणे म्हणाले की, महापालिकेच्या नगरविकास योजनेस (टीपी) स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. चऱ्होलीच्या टीपी स्कीमला स्थगिती नको तर ती रद्द व्हावी. येथे विकास आराखडा (डीपी) तयार असून, टीपीही टाकण्यात आली. मोशीमध्ये कत्तलखाना करण्यास विरोध आहे. कचरा डेपोची हद्दवाढ केली आहे. कचरा डेपो फक्त मोशीवर लादू नये, याला आमचा विरोध आहे. विधानसभेवेळी वाईट गोष्टींच्या विरोधात गेलो. त्याला माझ्या सर्व नगरसेवकांचा पाठिंबा होता. विलास लांडे यांना पंढरपूर देवस्थानचे विश्वस्तपद द्यावे.
काही पक्षांकडे काम करायला माणसे नव्हती
शहरात काही पक्षांकडे काम करायला माणसे नव्हती. त्यांनी आपलेच लोक तिकडे घेतले. त्यांना पद देऊन पक्ष वाढवला. त्यातूनच २०१७ मध्ये आपल्या विचाराची महापालिका आली नाही, अशा शब्दात पवारांनी नाव न घेता भाजपला टोला लगावला.