सात तास विमानतळावर बसून होतो; आमचे आर्थिक नुकसान झाले, वाकडमधील बोरसेंचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:42 IST2025-04-24T15:38:22+5:302025-04-24T15:42:01+5:30
आम्ही ज्या कंपनीकडून फिरण्यासाठी आलो होतो, ते कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे, याला जबाबदार कोण?

सात तास विमानतळावर बसून होतो; आमचे आर्थिक नुकसान झाले, वाकडमधील बोरसेंचा अनुभव
पिंपरी : आम्ही कालच वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र केले. त्यानंतर श्रीनगरला आलो. पहलगामला दहशतवादी हल्ला झाल्याने पुढील पर्यटनाचा बेतच रद्द केला आहे. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे. घरी परतण्यासाठी श्रीनगरला सात तास विमानतळावर बसून होतो, अशी माहिती वाकड येथील शैलेश बोरसे यांनी बुधवारी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाकडमधील संतोषनगरमधील बोरसे कुटुंबातील शैलेश, रूपाली, महिका, स्पर्श, सागर आणि बागूल कुटुंबातील ऊर्मिला व मुलगा शर्विल हे कुटुंबीय पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरला गेले आहेत. पहिल्या दिवशी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर मंगळवारी रात्री श्रीनगर येथे आले.
शैलेश बोरसे म्हणाले, एका खासगी पर्यटन कंपनीच्या वतीने सोमवारपर्यंत (२८ एप्रिल) जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाचे नियोजन केले होते. दोन कुटुंबांतील आम्ही सातजण आलो आहोत. या परिसरातील रस्ते अरुंद असून हा बर्फाच्छादित प्रदेश आहे. वैष्णोदेवीहून श्रीनगरला परतताना खूप वेळ लागला. मात्र, पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याने आम्ही सर्वांनी चर्चा केली. वातावरण गंभीर असल्याने पुन्हा घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळपासून आम्ही पुण्यास येण्यासाठी श्रीनगरच्या विमानतळावर बसून होतो. पुणे जिल्ह्यातील प्रशासनानेही आमच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर सायंकाळी चारच्या विमानाने दिल्लीत आलो. रात्री साडेनऊला विमान असून रात्री उशिरा पुण्यात परतणार आहोत. दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटनावर मोठा परिणाम झाला असून त्यात आमचेही नुकसान झाले आहे. आम्ही ज्या कंपनीकडून फिरण्यासाठी आलो होतो, ते कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण?