No Parking दुचाकीचे टोईंग केले; वाहतूक पोलीस महिलेला दुचाकीचालकांकडून मारहाण
By नारायण बडगुजर | Updated: December 15, 2024 15:12 IST2024-12-15T15:11:55+5:302024-12-15T15:12:12+5:30
पोलिसांनी त्या व्यक्तीची दुचाकी नो पार्किंगमध्ये पार्क केल्याने टो केली होती

No Parking दुचाकीचे टोईंग केले; वाहतूक पोलीस महिलेला दुचाकीचालकांकडून मारहाण
पिंपरी : वाहतूक पोलिसांनी दुचाकीचे टोईंग केले असता दोन दुचाकी चालकांनी वाहतूक पोलिस महिलेला अरेरावी करत मारहाण केली. तसेच टोईंग व्हॅन अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. चिंचवड येथे लिंक रस्त्यावर शनिवारी (दि. १४) दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मिलिंद राजेंद्र पवार (३३, रा. खडकी), एक महिला (२८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस अंमलदार सुप्रिया बोऱ्हाडे यांनी याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बीएनएस कल १३२, १२१ (१), २१८, २२१, ३२४, ३५२, ३ (५) प्रमाणे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया बोऱ्हाडे या चिंचवड वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. त्या शनिवारी टोईंग व्हॅनवर कर्तव्यावर होत्या. लिंक रोड वरील एल्प्रो मॉल जवळ नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी टोईंग व्हॅनमध्ये भरण्याचे काम सुरू असताना संशयित तिथे आले. पोलिसांनी त्यांची दुचाकी देखील नो पार्किंगमध्ये पार्क केल्याने टो केली होती. त्या कारणावरून संशयितांनी पोलिस अंमलदार सुप्रिया बोऱ्हाडे यांना त्यांची गाडी सोडण्यास सांगितले. त्यावर ‘नियमानुसार दंड भरून वाहतूक विभागाच्या कार्यालयातून गाडी घेऊन जा’ असे उत्तर बोऱ्हाडे यांनी दिले. त्या कारणावरून संशयितांनी बोऱ्हाडे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणात बोऱ्हाडे यांचा मोबाईल रस्त्यावर पडल्याने फुटला. तसेच संशयितांनी टोईंग व्हॅन अडवून गाडी सोडण्यासाठी दमदाटी केली. तसेच फिर्यादी सुप्रिया बोऱ्हाडे करीत असलेल्या सरकारी कामात त्यांनी अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल करंबळकर तपास करीत आहेत.