Hinjawadi: झोपेच्या १० गोळ्या खाल्ल्या; मालकाने सुरक्षरक्षकाला मदतीला पाठवले, महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:06 IST2025-09-18T10:05:47+5:302025-09-18T10:06:43+5:30
महिला बेडरूममध्ये बेशुद्ध झाल्यावर त्यांना काही वेळाने जाग आली असता सुरक्षा रक्षक महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले

Hinjawadi: झोपेच्या १० गोळ्या खाल्ल्या; मालकाने सुरक्षरक्षकाला मदतीला पाठवले, महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
पिंपरी : झोपेच्या गोळ्या खाल्लेल्या महिलेने जीवाची भीती वाटल्याने तिने घरमालकाला फोन करून हकिगत सांगितली. घरमालकाने इमारतीच्या सुरक्षारक्षकाला महिलेच्या मदतीला पाठविले. त्यावेळी झोपेच्या गोळ्यांच्या गुंगीत असलेल्या महिलेवर सुरक्षारक्षकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात महिलेला जाग आली आणि तिने सुरक्षारक्षकाला विरोध केला. ही घटना २६ जुलै रोजी मारूंजी येथे घडली. गजानन असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित ४६ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. १६ सप्टेंबर) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने २६ जुलै रोजी रात्री झोपेच्या दहा गोळ्या खाल्ल्या. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर जिवाचे बरे वाईट होईल या भितीने त्यांनी घरमालकाला या बाबत मेसेज करून सांगितले. पाच ते दहा मिनिटांनी घर मालकांनी फोन करून रुग्णवाहिका पाठवत आहे. तुम्ही त्यासोबत जा, मी देखील येत आहे, असे सांगितले. त्यानंतर साडेबारा वाजता दरवाजाची बेल वाजली. त्यावेळी इमारतीचा सुरक्षा रक्षक आला. त्याने घरमालकाने तुमच्या मदतीला पाठविले आहे, असे सांगितले. मात्र, अचानक चक्कर आल्याने फिर्यादी या बेडरूममध्ये बेशुद्ध झाल्या. काही वेळाने त्यांना जाग आली असता संशयित सुरक्षा रक्षक पीडित महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. त्यांनी संशयिताला ढकलले. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. या अर्जाच्या चौकशीअंती पोलिसांनी गुन्हा दाखल केला.