चोरट्यांकडून पोलिसांवर गोळीबार; हवालदाराने पिस्तूल हिसकावले, पुणे-मुंबई महामार्गावर सिनेस्टाईल थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 20:51 IST2025-11-27T20:51:38+5:302025-11-27T20:51:47+5:30
पोलिसांनी देशी बनावटीची दोन पिस्तुले, सात जिवंत काडतुसे, चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने, धारदार शस्त्रे असा एकूण आठ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला

चोरट्यांकडून पोलिसांवर गोळीबार; हवालदाराने पिस्तूल हिसकावले, पुणे-मुंबई महामार्गावर सिनेस्टाईल थरार
पिंपरी : घरफोडीतील सराईत चोरट्यांची कार थांबवून त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस हवालदाराने प्रसंगावधान दाखवत पिस्तूल हिसकावले. या झटापटीवेळी झालेल्या गोळीबारात कारच्या टपामधून (छतामधून) गोळी आरपार गेली. पोलिसांनी तीन सराईतांना अटक केली. मावळ तालुक्यात पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा टोलनाक्याजवळ गुरुवारी (दि. २७ नोव्हेंबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास हा थरार घडला.
सनीसिंग पापासिंग दुधानी (वय २४), जलसिंग राजपूतसिंग दुधानी (३२, दोघेही रा. हडपसर, पुणे), मनीष बाबुलाल कुशवाह (२८, सध्या रा. हडपसर, पुणे; मूळ रा. जि. मुरैना, मध्यप्रदेश), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील घरफोड्या व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. दरम्यान, रावेत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट दोनकडून सुरू होता. दरम्यान, पथकातील पोलिस हवालदार विक्रम कुदळ यांना माहिती मिळाली की, संशयित हे चोरीच्या कारमधून सोमाटणे फाटा टोलनाक्यावर येणार आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी टोलनाक्यावर सापळा रचला. पथकाने संशयित कार थांबवून चोरट्यांना बाहेर येण्यास सांगितले. त्यावेळी पोलिसांवर गोळीबार करण्यासाठी कारमध्ये मागे बसलेल्या मनीष कुशवाह याने त्याच्याकडील पिस्तूल काढले. पोलिस हवालदार भाऊसाहेब राठोड यांनी प्रसंगावधान दाखवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळून कुशवाह याच्या हातातील पिस्तूलातून गोळी कारच्या छताच्या (टपाच्या) आरपार गेली. हवालदार राठोड यांनी लागलीच कुशवाह याच्याकडून पिस्तूल हिसकावले. कुशवाह याच्यासह कारमधील संशयित सनीसिंग आणि जलसिंग दुधानी यांनाही पोलिसांनी जेरबंद केले.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डाॅ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, पोलिस अंमलदार विक्रम कुदळ, भाऊसाहेब राठोड, तुषार शेटे, विक्रांत चव्हाण, मोहम्मद गौस नदाफ, कृष्णा शितोळे, प्रशांत सैद, अमर राणे, सुखदेव गावंडे, धनंजय जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी संशयितांकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले, सात जिवंत काडतुसे, चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने, धारदार शस्त्रे असा एकूण आठ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.
७० गुन्ह्यांचे रेकॉर्ड!
सनिसिंग दुधानी हा विविध पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल ७० गुन्ह्यांमध्ये व जलसिंग दुधानी ५० गुन्ह्यांमध्ये ‘वॉन्टेड’ असल्याचे तपासात समोर आले. दोघेही पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व परिसरात घरफोडी, चोरी, वाहनचोरी अशा गंभीर गुन्ह्यांत सतत सक्रिय होते. संशयितांवर यापूर्वी पुणे पोलिसांकडून ‘मोका’अंतर्गत कारवाई झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
चोरीच्या कारमधून येऊन घरफोडी
संशयित यांची घरफोडीची टोळी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. ते घरफोडी करण्यासाठी कार चोरी करून त्या कारमधून जायचे. त्यानंतर घरफोडी करायच्या परिसरात कार पार्क करायचे. घरफोडी केल्यानंतर चोरीची कार रस्त्यात सोडून पसार व्हायचे.