‘ते’ ॲम्ब्युलन्समधून मतदानास आले, सत्ताबदल झाला अन् मी मुख्यमंत्री झालो! फडणवीसांनी सांगितली जगतापांची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:28 IST2026-01-02T10:28:03+5:302026-01-02T10:28:25+5:30
लक्ष्मण जगताप केवळ निवडणुका नव्हे, तर मन जिंकणारे नेते होते, ते शेती-मातीतून तयार झालेले नेतृत्व होते

‘ते’ ॲम्ब्युलन्समधून मतदानास आले, सत्ताबदल झाला अन् मी मुख्यमंत्री झालो! फडणवीसांनी सांगितली जगतापांची आठवण
पिंपरी : आमदार लक्ष्मण जगताप यांना काळाच्या पलीकडे पाहण्याची सवय होती. विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी कार्डियाक ॲम्ब्युलन्समधून येत मतदान केले. मला ‘मुख्यमंत्री साहेब’ म्हणून हाक मारली आणि त्यानंतर १५ दिवसांतच सत्ताबदल झाला. मी मुख्यमंत्री झालो... अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवण जागवली.
निमित्त होते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ पिंपळे गुरव येथे उभारलेल्या शक्तिस्थळाच्या लोकार्पणाचे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर त्यांनी जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला.
ते म्हणाले की, विधानपरिषदेच्या निवडणुकीचा क्षण मी विसरू शकत नाही. अटीतटीची परिस्थिती होती. आमदार म्हणून लक्ष्मण जगताप यांचेही मत महत्त्वाचे होते. मात्र, ते आजारी होते. त्यावेळी अश्विनीताई जगताप आणि शंकर जगताप यांना मी फोन केला. पक्षाला गरज आहे. मात्र, शारीरिक परिस्थिती असेल तरच त्यांना मतदानाला आणा, असा निरोप दिला. ही गोष्ट त्यांच्या कानावर पोहोचली. तेव्हा त्यांनी ‘पक्ष प्रथम’ असे सांगत मतदानाला जाण्याचा निर्धार केला. कार्डियाक ॲम्ब्युलन्समधून येत त्यांनी मतदान केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यानंतर जगताप यांची आठवण होते. त्यांच्या चिरस्थायी कार्याची आठवण देणाऱ्या, कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या शक्तिस्थळाचे लोकार्पण करण्यात आले आहे. आम्ही कायम जगताप कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहोत. यापुढील काळात जगताप यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे, ही आपली जबाबदारी आहे.
कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, बापूसाहेब पठारे, संयोजक आमदार शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, चंद्रकांत मोकाटे, विलास लांडे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आप्पासाहेब रेणुसे, ऐश्वर्या रेणुसे, विजय जगताप आदी उपस्थित होते. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले.
केवळ निवडणुका नव्हे, तर मन जिंकणारे नेते
लक्ष्मण जगताप केवळ निवडणुका नव्हे, तर मन जिंकणारे नेते होते. ते शेती-मातीतून तयार झालेले नेतृत्व होते. कोणताही मोठा राजकीय वारसा त्यांच्याजवळ नव्हता. मात्र, स्वतःच्या हिमतीवर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि कधी मागे वळून पाहिलेच नाही. ते लढवय्ये होते. विपरीत परिस्थितीतही ते नेहमी विजयी होत.