'तो' घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपने काढला नाही; चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 20:27 IST2025-11-07T20:26:17+5:302025-11-07T20:27:25+5:30
अनेक जण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पार्थ पवारांचा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने समोर आणल्याचे म्हणत आहेत

'तो' घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपने काढला नाही; चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण
पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अनेक जण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने समोर आणला असल्याचे म्हणत आहेत. मात्र, काही गोष्टी या समोर येत असतात. त्या काढाव्या लागत नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. मात्र, हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाने काढला नसल्याचे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रकल्पांचा मंत्री पाटील यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढती करणार आहे. ज्या प्रभागात युती होईल तेथे युती तर, बाकीच्या प्रभागात स्वबळावर अशी हायब्रिड युती करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकांसाठी महायुती म्हणूनच लढायचे असे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संपूर्ण राज्यात दौरा केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत त्यांनी प्रत्येक जिल्ह्याला एक तास वेळ देत आढावा घेतला. त्यामध्ये त्यांनी शक्यतो निवडणुका या महायुती म्हणून लढवल्या पाहिजे असे मत मांडले. ज्या ठिकाणी महायुती म्हणून निवडणुका शक्य नाही त्याठिकाणी हायब्रिड युती केली पाहिजे. म्हणजेच पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये ३२ प्रभाग आहेत. तर, त्या ३२ पैकी किमान २२ प्रभागांमध्ये एकत्र निवडणूक लढवली पाहिजे. उर्वरित १० ठिकाणी स्वबळावर लढले तरी चालेल. ज्याठिकाणी युती करणे शक्यच नाही किंवा ज्याठिकाणी ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, तेथे त्यांनी स्वबळावरच लढले पाहिजे. मात्र, महायुती म्हणून एकत्र लढण्याचेच आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
तीन दिवस पिंपरी दौरा
भाजपा नेते चंद्रकांत पाटील हे शहरातील तीनही विधानसभा मतदासंघाचा तीन दिवस आढावा घेणार आहेत. पहिल्या दिवशी शुक्रवारी (दि.६) चिंचवड मतदार संघ, त्यानंतर शनिवारी (दि.८) पिंपरी व रविवारी (दि.९) भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. त्यात महापालिका निवडणुकीबाबत ते स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.