अनैतिक संबंधाचा त्रास; आई अन् मुलाने कट रचला, तरुणाचा खून करून चेहरा दगडाने ठेचला, चाकणमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:23 IST2026-02-03T19:22:57+5:302026-02-03T19:23:10+5:30
चाकण पोलिसांच्या पथकाने सलग २० दिवस सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास, भौतिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे या गुन्ह्याची उकल केली

अनैतिक संबंधाचा त्रास; आई अन् मुलाने कट रचला, तरुणाचा खून करून चेहरा दगडाने ठेचला, चाकणमधील धक्कादायक प्रकार
पिंपरी : नातेवाईक महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधांतून होणारा सततचा त्रास आणि त्यातून निर्माण झालेला संशय अखेर एका तरुणाच्या निर्घृण खुनाचे कारण ठरले. चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिरदवडी गावच्या स्मशानभूमीमागील ओढ्याजवळ आढळलेल्या अनोळखी मृतदेहामागील धक्कादायक रहस्य २० दिवसांच्या अथक तपासानंतर उघडकीस आले आहे.
मुंजा धोंडीबा नरहिरे (वय २५, रा. गंगाखेड, जि. परभणी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. निखील नानासाहेब चव्हाण (२१, रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. काथनेश्वर, पो. धसाडी, जि. गंगाखेड, जि. परभणी), त्याची आई उषा नानासाहेब चव्हाण (४०, रा. गंगाखेड, जि. परभणी), स्वप्नील नरहरी पारधी (१९, रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. ढोकी, ता. जि. नांदेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त मारुती जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह दि. ११ जानेवारी रोजी निर्जन ठिकाणी आढळून आला होता. डोक्यावर धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला होता, तर ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने छिन्नविछिन्न करण्यात आला होता. मृताच्या खिशातील मोबाइल व ओळखपत्रही काढून नेण्यात आले होते. उत्तर चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या पथकाला घटनास्थळी दारु व पाण्याची बाटली, सिगारेट मिळून आली. त्यावरून शोध घेतला असता एका दुकानदाराकडून संशयितांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच इन्स्टाग्रामवरून देखील संशयितांचा शोध घेत असता एका तरुणाच्या प्रोफाइलवर संशयित दुचाकी आढळून आली. त्यावरून दुचाकीमालकाशी संपर्क साधला असता संशयित तरुणांची नावे समोर आली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, मुंजा नरहिरे याचा हा मृतदेह असल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाले. तपासात समोर आले की, निखिल चव्हाण याच्या जवळच्या नातेवाईक महिलेशी मुंजा नरहिरे याचे अनैतिक संबंध होते. संबंधित महिलेला तो सतत त्रास देत असल्याने निखिल चव्हाण, त्याचा मित्र स्वप्नील पारधी आणि निखिल चव्हाण याची आई उषा चव्हाण यांनी आपसांत संगनमत करून खुनाचा कट रचला.
मुंजा नरहिरे याला त्याच्या मूळगावावरून चाकण येथे दि. ७ जानेवारी रोजी बोलावून घेतले. त्यानंतर निखील आणि स्वप्नील यांनी मुंजा याला दारू पिण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेले. तेथे कोयत्याने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून मुंजाचा निर्घृण खून केला. नंतर ओळख नष्ट करण्यासाठी दगडाने चेहरा विद्रूप केला. चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या पथकाने सलग २० दिवस सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास, भौतिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे या गुन्ह्याची उकल केली.
सहायक पोलिस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील, उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, सहायक फौजदार सुनील शिंदे, पोलिस अंमलदार भैरोबा यादव, प्रितम ढमढेरे, योगेश कोळेकर, शिवाजी लोखंडे, महेश कोळी, शरद खैरनार, सुमित जगताप यांच्या पथकाने ही कामगिरी केली.