Pimpri Chinchwad: पिंपरीत आढळलेला 'तो' मृतदेह बेपत्ता वकीलाचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 21:13 IST2023-01-02T21:13:37+5:302023-01-02T21:13:54+5:30
वकिलाच्या कार्यालयाची तपासणी केल्यावर कार्यालयातील वस्तू अस्ताव्यस्त असून त्याठिकाणी झटापट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

Pimpri Chinchwad: पिंपरीत आढळलेला 'तो' मृतदेह बेपत्ता वकीलाचा?
पिंपरी : काळेवाडी येथील वकील बेपत्ता झाल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.३१) करण्यात आली होती. वकिलाच्या कार्यालयातही एखाद्या व्यक्तीसोबत झटापट झाल्यासारखी परिस्थिती पोलिसांना आढळून आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवर अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवशंकर दत्तात्रय शिंदे (वय ४५, रा.बोराडे वस्ती, मोशी) असे बेपत्ता झालेल्या वकिलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर शिंदे हे वकील असून काळेवाडी येथे त्यांचे कार्यालय आहे.शनिवारी (दि. ३१) दुपारी शिंदे हे बेपत्ता झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी वाकड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. दरम्यान, महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवर एक अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. तो मृतदेह शिंदे यांचा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृतदेहाची अजून ओळख पटली नसून वाकड पोलिसांसह गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती वाकडचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान वाकड पोलिसांनी शिंदे यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता कार्यालयातील वस्तू अस्ताव्यस्त असून त्याठिकाणी झटापट झाल्याची शक्यता आहे. तसेच रक्ताचे काही नमुने भेटले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.