खंडाळा घाटात भयानक अपघात; ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू, १४ जण जखमी

By विश्वास मोरे | Updated: April 21, 2025 15:58 IST2025-04-21T15:57:49+5:302025-04-21T15:58:46+5:30

मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाट परिसरातील तीव्र उतारावर नियंत्रण सुटलेल्या ट्रकने पाच वाहनांना जोरदार धडक दिली

Terrible accident at Khandala Ghat Truck hits 5 vehicles Three including father and daughter die 14 injured | खंडाळा घाटात भयानक अपघात; ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू, १४ जण जखमी

खंडाळा घाटात भयानक अपघात; ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू, १४ जण जखमी

लोणावळा : जुन्या मुंबई-पुणेमहामार्गावरील बोरघाट परिसरातील तीव्र उतारावर नियंत्रण सुटलेल्या ट्रकने रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास पाच वाहनांना जोरदार धडक दिली. त्यात कारमधील बाप-लेकीसह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, १४ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर पांडुरंग इंगुळकर (रा.  पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ट्रक मुंबईच्या दिशेने जात असताना खंडाळा घाटातील उतारावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने समोरून येणाऱ्या पाच वाहनांना जोरदार धडक दिली. त्यात प्रिया सागर इंगुळकर (वय ३५, रा.  शुक्रवार पेठ, टिळक रोड, पुणे), निलेश संजय लगड (वय ४२ वर्षे), श्राव्या निलेश लगड (वय १२ वर्षे,  दोन्ही रा. सदशिवपेठ, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. 

असा झाला अपघात 

मुंबई पुणे महामार्गावर रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास खंडाळा बॅटरी हिल या ठिकाणी भरधाव वेगातील ट्रक (जी जे ६३, बीटी ६७०१) हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. ट्रकने समोरील इनोव्हा (एमएच १९, बीसी ८०६७) ला धडक दिली. त्या धडकेमुळे इनोव्हा गाडी समोरून येणारी एर्टिगा (एमएच १२, युसी २८००) ला जाऊन धडकली. या भीषण अपघातामध्ये १४ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींची नावे 

 या अपघातामध्ये एर्टिगा कारमधील शस्यु मोगल, रूद्राक्ष मोगल, अषिका मोगल, आरव मोगल, अर्ष लगड, आरसित लगड यांना हाता पायाला व खांदयाला किरकोळ दुखापत झाल्या असून मुका मार लागलेला आहे. तर इनोव्हा कारमधील प्रवासी अष्वीनी रमेष जाडकर (वय ४३ वर्षे), ओमकेश रमेश जाडकर (वय २२ वर्षे), सुमित तुकाराम कदम (वय २४ वर्षे), पुष्कार लक्ष्मण शेळकंदे (वय २५ वर्षे), जिगनेश रमेश जाडकर (वय १२ वर्षे), संजय नामदेव वाल्हेकर (वय ४२ वर्षे), विमल नामदेव वाल्हेकर (वय ६९ वर्षे सर्व रा. भिंवडी जि. ठाणे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड पुढील तपास करत आहेत.

ट्रक चालक घटनास्थळावरून फरार 

अपघाताची माहिती मिळताच लोणावळा पोलीस, बोरघाट वाहतूक पोलीस व स्थानिक आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आणि काही वेळात महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, लोणावळा पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या अपघातामुळे खंडाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी घाटमार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडून कठोर उपाययोजनांची मागणी केली आहे.

Web Title: Terrible accident at Khandala Ghat Truck hits 5 vehicles Three including father and daughter die 14 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.