श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे तब्बल ११ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:24 IST2025-10-13T12:22:27+5:302025-10-13T12:24:19+5:30
दीनदुबळे आणि पीडित जनतेची सेवा करणे हेच संत शिकवणीचे सार असून भविष्यातही सामाजिक भान राखून हे कार्य अविरत सुरू राहील, असे संस्थानच्या वतीने नमूद केले

श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे तब्बल ११ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द
पिंपरी : नैसर्गिक आपत्तीने होरपळून निघालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू यांनी पुन्हा एकदा मानवसेवेचा वारसा जपत पुढाकार घेतला आहे. संस्थानतर्फे तब्बल अकरा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना हा निधी संस्थानचे अध्यक्ष व जगद्गुरूंचे वंशज जालिंदर महाराज मोरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी विश्वस्त उमेश महाराज मोरे, श्री. गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे आणि लक्ष्मण महाराज मोरे उपस्थित होते.
जगदगुरू संत तुकाराम महाराजांनी दुष्काळात स्वतःचा धान्यसाठा उघडून जनतेच्या सेवेसाठी अर्पण केला होता. त्याच प्रेरणेने, आजच्या काळातील अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मदतीचा हातभार देत आहोत. दीनदुबळे आणि पीडित जनतेची सेवा करणे हेच संत शिकवणीचे सार असून भविष्यातही सामाजिक भान राखून हे कार्य अविरत सुरू राहील, असे संस्थानच्या वतीने नमूद केले.