मागे एक अन् पुढे एक बसवायचं का? पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दुचाकीसाठी २ वेगळे नंबर, नागरिक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 13:47 IST2025-05-12T13:45:57+5:302025-05-12T13:47:05+5:30
पुढील बाजूची नंबर प्लेट MH 14 BN 8927 तर मागील बाजूची दुसरी नंबर प्लेट एम एच 20 बी एन 8927 अशी आहे

मागे एक अन् पुढे एक बसवायचं का? पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दुचाकीसाठी २ वेगळे नंबर, नागरिक संतप्त
महादेव मासाळ
पिंपळे गुरव : नागरिकांच्या गाड्यांचे चोरी होण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून राज्याच्या आरटीओ विभागाकडून एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची नागरिकांना सक्ती केली आहे. त्यानुसार नागरिकांनी देखील ती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र पिंपरी चिंचवड विभागात एका व्यक्तीला एकाच गाडीसाठी दोन नंबर आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारचाकारभार चव्हाट्यावर आलायचे पहायला मिळत आहे. या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
राज्य शासनाकडून नवीन नंबर प्लेट बसवण्याचे कॉन्टरेक्ट एका कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे ही संपूर्ण
प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करताना नागरिकांकडून संपूर्ण पैसे घेतले जात आहेत. अपॉइंमेंट नुसार नंबर प्लेट बसवून दिल्या जात आहेत. मात्र, पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव परिसरात राहत असलेले महेश आगम यांनी ऑनलाईन नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन केले होते. मात्र त्यांना संबंधित कंपनीकडून एकाच वाहनसाठी दोन नंबर प्लेट आल्या. त्यात पुढील बाजूची नंबर प्लेट MH 14 BN 8927 तर मागील बाजूची दुसरी नंबर प्लेट एम एच 20 बी एन 8927 अशी आहे. त्यात आगम यांच्या दुचाकीचा MH 14 BN 8927 हा क्रमांक त्यांचा ओरिजनल असून मागे बसवण्यात येणारा क्रमांक हा चुकीचा आला आहे. त्यामुळे आगम यांनी संताप व्यक्त करत आर टी ओ प्रशासनाच्या च्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
मला आलेले दोन्ही क्रमांक वेगळे असून हो संपूर्ण चूक राज्य सरकारची असून त्यांनी ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. त्यांची ही चूक आहे. ज्यावेळी मी आपइनमेंट नुसार नंबर प्लेट बसावायाला गेलो त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. संबंधित नंबर प्लेट बसवणाऱ्यांनी पुढच्या काही वेळात नंबर प्लेट दुरुस्त करून बसवून देतो असे देखील सांगितले आहे. राज्य सरकारने ठेका दिलेल्या अशा कंपन्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेक ठिकाणी नंबर प्लेट बसवताना नागरिकांशी हुज्जत देखील घातली जात असल्याचे पहायला मिळत आहे. - महेश आगम, वाहनचालक ,पिंपळे गुरव
आरटीओ कार्यालयाकडून कधीच चुकीचा वाहन क्रमांक दिला जात नाही. या घटनेमध्ये नंबर प्लेट प्रिंट करणाऱ्या संबंधित कंपनीची कदाचित ही चूक असेल.नंबर प्लेट पॅकेजिंग करताना संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून नजरचुकीने हे झाले असू शकते. सदर वाहनचालकाने संबंधित कंपनीला याविषयी माहिती दिल्यास नंबर प्लेट बदलून मिळेल. - राहुल जाधव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड