पिंपरी बाजारात भरदिवसा गोळीबार; सोनसाखळी चोरट्याकडून झटापट, दुकानदार तरुण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 20:24 IST2025-08-01T20:22:36+5:302025-08-01T20:24:10+5:30

शीत पेय घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या चोरट्याने भरदिवसा मालकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला

Shooting in broad daylight at Pimpri market Gold chain thief fights shopkeeper injured | पिंपरी बाजारात भरदिवसा गोळीबार; सोनसाखळी चोरट्याकडून झटापट, दुकानदार तरुण जखमी

पिंपरी बाजारात भरदिवसा गोळीबार; सोनसाखळी चोरट्याकडून झटापट, दुकानदार तरुण जखमी

पिंपरी : शीत पेय घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या चोरट्याने भरदिवसा मालकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मालकाने प्रतिकार केल्याने चोरट्याने गोळीबार केला आहे. जांघेत गोळी घुसल्याने तरूण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १) दुपारी दीडच्या सुमारास पिंपरी कॅम्पात साई चौकाजवळ घडली.  पिंपरी पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेश काकराणी (वय २०, रा. अयप्पा मंदीराजवळ, पिंपरी कॅम्प) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याला पिंपळे सौदागर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. पिंपरी कॅम्पातील साई चौकाजवळ अयप्पा मंदीरालगत काकराणी कुटूंबियांचे ओमकार जनरल स्टोअर्स या नावाने किराणा मालाचे दुकान आहे. दुकानात नेहमी वडील आणि आई असतात. तर, भावेश कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. दुपारी भावेशची आई नेहमीप्रमाणे दुकानात बसली होती. काही कामानिमित्त आई घरी गेली. त्यामुळे भावेश दुकानात थांबला होता. दुकानाबाहेर तो बसला होता. दुपारी दीडच्या सुमारास थंड पेय घेण्याच्या बहाण्याने एकजण तेथे आला. भावेश त्याला थंड पेय देत असतानाच चोरट्याने गळयातील सोन्याची साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. चोरी करणार्‍या व्यक्तीला भावेश याने विरोध केला. 

झटापट आणि गोळीबार 

त्यावेळी झालेल्या झटापटीत सोनसाखळी तुटली. त्यामुळे अर्धी तुटलेली सोनसाखळी घेऊन चोरटा पळू लागला. मात्र, भावेशने त्याचा पाठलाग सुरू केल्याने चोरट्याने त्याच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी भावेशच्या पायाच्या जांघेत घुसली आहे. त्याही अवस्थेत भावेशने दगड उचलून चोरट्याच्या दिशेने मारला. मात्र, चोरटा पुढे जाऊन दुचाकीवरून पसार झाला. 

चोरट्याच्या मागावर दहा ते बारा पथके

गंभीर जखमी झालेल्या भावेशला तातडीने पिंपळे सौदागर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.  घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. भावेशवर सायंकाळी शस्त्रक्रीया करण्यात आली. चोरट्याच्या मागावर पोलीसांची दहा ते बारा पथके पाठविण्यात आली आहेत. तसेच, शहरात ठिकठिकाणी नाकाबंदीही लावली आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. चोरट्याच्या मागावर दहा ते बारा पथके रवाना करण्यात आली आहेत. ’’ - डॉ. शिवाजी पवार (पोलीस उपायुक्त - गुन्हे)

Web Title: Shooting in broad daylight at Pimpri market Gold chain thief fights shopkeeper injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.