Pimpri Chinchwad: शालेय शिक्षण मंत्री भुसेंची महापालिकेच्या शाळेला अचानक भेट; शिक्षकांसह अधिकाऱ्यांची उडाली धांदल
By प्रकाश गायकर | Updated: January 17, 2025 16:26 IST2025-01-17T16:25:45+5:302025-01-17T16:26:57+5:30
मंत्र्यांच्या या भेटीमुळे तरी महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

Pimpri Chinchwad: शालेय शिक्षण मंत्री भुसेंची महापालिकेच्या शाळेला अचानक भेट; शिक्षकांसह अधिकाऱ्यांची उडाली धांदल
पिंपरी : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपळे निलख शाळेला शुक्रवारी (दि. १७) अचानक भेट देत विद्यार्थ्यांना ‘सरप्राईज’ दिले. अचानक मंत्री शाळेत आल्याने शिक्षक आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ या शाळेत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, शिक्षण उपसंचालक हारुन आत्तार, माध्यमिकचे भाऊसाहेब कारेकर, पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षणाधिकारी संगीता बांगर, शिक्षक संघाचे अध्यक्ष विलास पाटील आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हणून आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षकांनी शिकवण्याची पद्धत कशी आहे याचे प्रात्याक्षिक दाखवले. दादा भुसे यांनी पाठ्यपुस्तकातील काही प्रश्न मुलांना विचारले. मुलांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
शालेय शिक्षण मंत्री शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. सकाळी मुंबई-बेंगलोर रस्त्यावरून जात असताना त्यांनी पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या पिंपळे निलख येथील शाळेला अचानक भेट दिली. या भेटीमुळे शाळेतील शिक्षकांचा चांगलाच गोंधळ उडाला. दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील विविध प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांनी देखील मंत्री भुसे यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
महापालिकेच्या शाळांकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन काही प्रमाणात बदलला आहे. तसेच अलीकडे पालक महापालिका शाळेमध्ये पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी आग्रही असतात. महापालिकेच्या वतीने देखील शाळांमध्ये सोयी-सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. यामुळेच शालेय शिक्षण मंत्र्यांनी थेट महापालिकेच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची बौद्धिक तपासणी केली. मंत्र्यांच्या या भेटीमुळे तरी महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंत्र्यांनी अशाच पद्धतीने भेट दिल्यास शाळेची गुणवत्ता वाढेलच पण शिक्षकांवर काही प्रमाणात धाक राहणार असल्याची चर्चा या ‘सरप्राइज’ भेटीच्या निमित्ताने होत आहे.
पवार गटाचे शहराध्यक्षही उपस्थित
दरम्यान, पिंपळे निलख येथील शाळेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आल्याची माहिती मिळताच शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे देखील शाळेत पोहचले. त्यांनी ‘मी या भागातील नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा शहराध्यक्ष असल्याची ओळख करून दिली.’