रस्त्याच्या कामात आडवे येणाऱ्यांना उचला; त्यांच्यावर गुन्हे दाखल करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 15:27 IST2025-07-13T15:26:43+5:302025-07-13T15:27:48+5:30
- आयटी पार्कमध्ये पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश

रस्त्याच्या कामात आडवे येणाऱ्यांना उचला; त्यांच्यावर गुन्हे दाखल करा
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरातील रस्ते रुंद करा, आडवे येणाऱ्यांना उचला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात मुंबई येथे बैठक घेतली. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. १३ जुलै) सकाळी हिंजवडी आयटी पार्क येथे पाहणी केली. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील पुणे मेट्रो लाईन ३ स्थानकांची आणि मेट्रोच्या कामाचीही पाहणी यावेळी त्यांनी केली.
अजित पवार यावेळी म्हणाले, आयटी पार्कमधील रस्ते छोटे करू नका. रस्ते रुंद करावेत. तसेच रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे अनधिकृत बांधकामे पाडा. रस्त्यांसाठी शासनाच्या विविध विभागांकडील जमिनीचा वापर करा. तसेच खासगी जमिनीच्या मालकांचे नुकसान न होता त्यांना योग्य मोबदला देऊन रस्त्याची कामे मार्गी लावा. रस्त्याच्या कामांमध्ये आडवे येणाऱ्यांना उचला. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. नाल्यांवरील अनधिकृत बांधकामे पाडा. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. नाले प्रवाहित करावेत.
मेट्रो स्टेशनचा सरकता जिना हटविणार?
आयटी पार्क चौकातील क्रोमा चौकातील मेट्रो स्टेशनचा सरकता जिना आहे. या सरकत्या जिन्यामुळे रस्ता अरुंद झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले. याबाबत अजित पवार यांनी सूचना केली. जिन्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे रस्ता अरुंद होता कामा नये. रस्ता रुंद करण्यासाठी उपायययोजना करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
‘पाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना करा’
पावसाचे पाणी साचून हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्त्यांवर पूर आला होता. या ठिकाणांचीही अजित पवार यांनी पाहणी केली. हिंजवडी, माण, मारुंजी भागातील नैसर्गिक ओढे - नाल्यांवरील अतिक्रमण तसेच पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे पावसाचे पाणी साचत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना करावी. संबंधित अतिक्रमणांवर कठोर कारवाई करून प्रवाह मोकळे करण्याचे निर्देश पवार यांनी प्रशासकीय यंत्रणांना यावेळी दिले.
पुणे मेट्रो लाईन ३ चे काम गतीने पूर्ण करावे
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइन ३ सुरू झाल्यास वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी मेट्रो लाईन ३ चे काम गतीने पूर्ण करावे, अशा सूचना अजित पवार यांनी मेट्रो व टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.