पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून दापोडीत तरुणाचा खून; दोन संशयितांना पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 15:25 IST2025-10-05T15:24:42+5:302025-10-05T15:25:12+5:30
- दोन वर्षांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून संशयितांकडून हल्ला

पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून दापोडीत तरुणाचा खून; दोन संशयितांना पोलिस कोठडी
पिंपरी : पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून तरुणाचा खून करण्यात आला. दापोडी येथे जय भवानी मित्र मंडळाच्या समोरील रस्त्यावर शुक्रवारी (दि. ३ ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दापोडी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. त्यांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत (दि. ९ ऑक्टोबर) पोलिस कोठडी सुनावली.
शेखर भालेराव (वय २४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील सुदाम भागू भालेराव (५४, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ४ ऑक्टोबर) दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गौरव गायकवाड (१९) आणि अजय खरात (२०, दोघेही रा. दापोडी) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
दापोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखरचे संशयित गौरव आणि अजय यांच्याशी दोन वर्षापूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून संशयितांनी शेखरवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच दापोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ससून रुग्णालयात शवविच्छेदन केले.
पोलिसांकडून काही तासांत अटक
दरम्यान, शेखरच्या वडिलांनी गौरव गायकवाड आणि अजय खरात यांच्यासह आशुतोष बाबासाहेब जाधव, अजय बाबासाहेब जाधव आणि अभिषेक चव्हाण यांच्यावरही संशय व्यक्त केला आहे. यातील गौरव आणि अजय या संशयितांना पोलिसांनी घटनेच्या काही तासांनंतर अटक करून न्यायालयात हजर केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव कोळी तपास करीत आहेत.