Pune Crime: डांगे चौकात रिक्षाभाड्यावरून वाद चिघळला; चालक-प्रवाशात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:37 IST2026-03-31T11:37:21+5:302026-03-31T11:37:55+5:30
दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Pune Crime: डांगे चौकात रिक्षाभाड्यावरून वाद चिघळला; चालक-प्रवाशात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
पिंपरी-चिंचवड : शहरातील गजबजलेल्या डांगे चौक परिसरात रिक्षाभाड्यावरून झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यात भाड्याच्या मुद्द्यावरून वादाला सुरुवात झाली. सुरुवातीला किरकोळ बाचाबाची असलेला हा वाद काही क्षणातच विकोपाला गेला. दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
भर चौकात घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना काहींनी संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.