नो एंट्रीतून आलेल्या थारमुळे; पोलिसांच्या वाहनाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 18:04 IST2024-12-31T18:04:06+5:302024-12-31T18:04:06+5:30
भरधाव वेगाने रस्ता दुभाजक ओलांडून थार ही गाडी आली.

नो एंट्रीतून आलेल्या थारमुळे; पोलिसांच्या वाहनाला अपघात
पिंपरी : नो एंट्रीमधून अचानक समोर आलेल्या थार गाडीमुळे पोलिसचालकाला शासकीय वाहनाला अचानक ब्रेक लावावा लागला. यावेळी झालेल्या अपघातात पुढील काचेवर धडकून कर्मचारी जखमी झाला. थार वाहनाला असलेल्या फॅन्सी नंबर प्लेटमुळे पोलिसांनी पाठलाग करूनही नंबर मिळविता आला नाही. पुणे - नाशिक महामार्गावर मोशी येथे रविवारी (दि. २९) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिस अंमलदार सागर यशवंत भोसले (वय ४०) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. काळ्या काचा असलेल्या काळ्या रंगाच्या थार गाडीच्या अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले हे एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यातील बोलेरो कंपनीची टू मोबाइल गाडी चालवत होते. ते पुणे - नाशिक महामार्गावरील मोशी येथे असलेल्या एका हॉटेलसमोर आले असता भरधाव वेगाने रस्ता दुभाजक ओलांडून थार ही गाडी आली. त्यामुळे फिर्यादी भोसले यांना अचानक ब्रेक करावा लागला. यामुळे भोसले यांचे डोके काचेवर आदळले. गाडीची काच फुटून त्यांच्या डोक्याला मार लागला. तसेच डाव्या हाताला व ओठालाही जखम झाली. भोसले यांनी थार गाडीचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी रस्त्यावरील दगड पोलिस गाडीच्या खालील बाजूस लागून शासकीय वाहनाचे नुकसान झाले, असे फिर्यादीत नमूद आहे.