पोलीस उपनिरीक्षक अडकले जाळ्यात

By Admin | Updated: June 22, 2016 00:42 IST2016-06-22T00:42:52+5:302016-06-22T00:42:52+5:30

येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गणेश शेषराव शिंदे यांनी तक्रारदाराकडे लाच स्वरूपात अ‍ॅपल ६ एस मोबाइलची मागणी केली

Police sub-inspector gets trapped | पोलीस उपनिरीक्षक अडकले जाळ्यात

पोलीस उपनिरीक्षक अडकले जाळ्यात

तळेगाव दाभाडे : येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गणेश शेषराव शिंदे यांनी तक्रारदाराकडे लाच स्वरूपात अ‍ॅपल ६ एस मोबाइलची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला पोलीस उपनिरीक्षक शिंदे लाच घेताना रंगेहाथ आढळून आले. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी तक्रारदाराकडे मोबाइल फोन अ‍ॅपल ६ एसची मागणी केली असल्याचे संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. त्यांची तक्रार नोंदवून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचला. तळेगाव येथील लेक पॅराडाईज सोसायटीच्या प्रवेशद्वारावर तक्रारदार व शिंदे यांची भेट झाली. शिंदे यांनी मागणी केल्यानुसार तक्रारदाराने अ‍ॅपल ६ एस मोबाइल आणला होता. शिंदे यांनी तो स्वीकारताच त्यांच्या मागावर असलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना पकडले. तक्रारदाराविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३९४ नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी भीती शिंदे तक्रारदाराला दाखवत होते. गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी महागडा मोबाइल द्यावा, असा शिंदे यांचा आग्रह होता. लाचस्वरूपात महागडा मोबाइल घेणे शिंदे यांना महागात पडले. (प्रतिनिधी)

Web Title: Police sub-inspector gets trapped