पिंपरीत एका व्यक्तीनं पुलावरून मारली उडी अन् केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 13:16 IST2021-10-11T13:16:19+5:302021-10-11T13:16:25+5:30
एका ५० वर्षीय व्यक्तीने पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले

पिंपरीत एका व्यक्तीनं पुलावरून मारली उडी अन् केला आत्महत्येचा प्रयत्न
पिंपरी : एका ५० वर्षीय व्यक्तीने पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुणे - मुंबई महामार्गावर पिंपरी येथे ग्रेडसेपरेटरमध्ये सोमवारी (दि. ११) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीकडून चिंचवडच्या दिशेने जाणाऱ्या ग्रेडसेपरेटरवरील पुलावरून एका ५० वर्षीय व्यक्तीने ग्रेडसेपरेटरमध्ये उडी घेतली. त्यामुळे अचानक वाहतूक खोळंबली. तसेच रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची गर्दी झाली. पोलीस कर्मचारी आबासाहेब बंडगर यांनी याबाबत अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानुसार पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशामक केंद्राचे जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीच्या हनुवटीला गंभीर जखम झाली असून मोठा रक्तस्त्राव झाला. त्याने उडी मारत असताना कोणीही प्रत्यक्षदर्शी नसल्याचे समजते. तसेच उडी मारणाऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाही. त्याने उडी मारण्याचेही कारण समजू शकलेले नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे.