पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘कमळाच्या छायेखाली’, बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी अजितदादांची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:15 IST2025-09-19T13:11:02+5:302025-09-19T13:15:41+5:30

तब्बल १५ वर्षे महापालिकेत सलग सत्ता राखल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला काबीज केला

Pimpri-Chinchwad politics under the bjp party Ajit pawar struggle to regain the ncp party | पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘कमळाच्या छायेखाली’, बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी अजितदादांची धडपड

पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘कमळाच्या छायेखाली’, बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी अजितदादांची धडपड

ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात गेल्या पंधरा वर्षांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा थेट मैदानात उतरले आहेत. भाजपने स्वबळावर शंभर नगरसेवक निवडून आणण्याचा नारा देत शहरभर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याला उत्तर म्हणून अजित पवार यांनी आता ‘जनसंवाद’ या शस्त्राचा अवलंब केला आहे. शनिवारी (दि.२०) चिंचवड येथे होणाऱ्या या संवादातून पवार शहरात पुन्हा पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. भाजपने सत्ता काबीज केल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘कमळाच्या छायेखाली’ गेले आहे. आता पवार यांचे प्रयत्न शहरात राष्ट्रवादीला नवसंजीवनी देतील का, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

२०१७ ला ३६ नगरसेवकांवर समाधान...

२०१७ मधील पराभवाचा अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला धक्का मानला जातो. तब्बल १५ वर्षे महापालिकेत सलग सत्ता राखल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला काबीज केला. १२८ पैकी अवघे ३६ नगरसेवकांवर राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले. पिंपरी-चिंचवडकरांनी विकासकामे असूनही साथ सोडली, अशी खंत पवार उघडपणे व्यक्त करतात.

वर्षभरात साधी कार्यकारिणीही नाही...

अजित पवार यांची ‘राष्ट्रवादी’ महायुतीत सत्तेत सहभागी झाल्यानंतरही शहरात प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही पक्षांतील स्थानिक पातळीवरील संघर्ष कमी झाला नाही. त्याउलट त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. भाजपकडे सध्या शहरातील चार आमदार, महापालिकेत मजबूत संघटन आणि सततच्या कार्यक्रमांचा धडाका आहे. तर राष्ट्रवादीकडे फक्त अण्णा बनसोडे आमदार असून, त्यांनाही उपाध्यक्षपद देऊन स्थानिक संघटनेत ऊर्जा आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, शहराध्यक्ष योगेश बहल यांनी अजूनही कार्यकारिणी जाहीर केली नाही.

Web Title: Pimpri-Chinchwad politics under the bjp party Ajit pawar struggle to regain the ncp party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.