पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; ३२ प्रभागांसाठी १२८ नगरसेवक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:35 IST2025-08-23T13:34:29+5:302025-08-23T13:35:08+5:30
२०१७ च्या प्रभाग रचनेत किरकोळ बदल करण्यात आले असून नैसर्गिकरित्या प्रभागांच्या हद्दी नव्याने तयार करण्यात आल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; ३२ प्रभागांसाठी १२८ नगरसेवक
पिंपरी : महापालिकेच्या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून नव्या प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. २२) अंतिम मान्यता दिली आहे. एकूण ३२ प्रभागांसाठी प्रत्येकी चार सदस्यीय प्रारूप प्रभाग रचना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मुख्य प्रशासकीय कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०१७ च्या प्रभाग रचनेत किरकोळ बदल करण्यात आले असून नैसर्गिकरित्या प्रभागांच्या हद्दी नव्याने तयार करण्यात आल्या आहेत.
फेब्रुवारी २०१७ नंतर आता साडेआठ वर्षांनी महापालिकेची निवडणूक होणार आहे. ती २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. मागील जनगणना २०११ मध्ये झाली होती. तेव्हाच्या १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्येनुसार प्रभाग रचना तयार केली आहे. नागरिकांना २२ ऑगस्टपासून ४ सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्याची संधी दिली गेली असून, त्यानंतर २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत सुनावणी होणार आहे. तीन ते सहा ऑक्टोबरदरम्यान राज्य निवडणूक आयोग अंतिम मंजुरी देणार असून त्यानंतर प्रत्यक्ष प्रभाग रचना जाहीर होईल.
गुगल मॅप व २०११ च्या जनगणनेचा आधार
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गुगल अर्थ मॅपचा आधार घेऊन तसेच प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून, स्थानिक परिसंस्थांचा अभ्यास करून ३२ प्रभागांचे नकाशे तयार केले आहेत. या प्रभागांची सुरुवात तळवडे-चिखलीपासून होऊन सांगवी परिसरापर्यंत शेवट केला आहे. प्रत्येक प्रभागात किमान ४९ हजार ते कमाल ५९ हजार मतदार असतील. मात्र शहरातील मतदार संख्येत १५ वर्षांत वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदारयादी स्वीकारली जाईल आणि त्यानुसार प्रभागनिहाय मतदारयादी विभागली जाईल.
प्रभाग आरक्षणाचे स्वरूप
अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी मिळाल्यानंतर आरक्षणानुसार जागा निश्चित करण्यात येतील. नव्या रचनेनुसार १२८ पैकी ९३ जागा आरक्षित केल्या जातील.
- महिला : ६४ जागा
- पुरुष : ६४ जागा
- अनुसूचित जाती : २० जागा
- अनुसूचित जमाती : ३ जागा
- इतर मागास वर्ग (ओबीसी) : ३५ जागा
- सर्वसाधारण महिला (खुला) : ३५ जागा
- सर्वसाधारण (खुला) : ३५ जागा
तळवडे-चिखली भागातून प्रभाग रचना सुरू करून सांगवी-दापाेडी अशा उतरत्या क्रमाने पूर्ण केली. प्रगणक गट (ब्लॉक) जुळवून प्रभाग नकाशे बनविण्यात आले. त्यासाठी गुगल अर्थ मॅपचा आधार घेण्यात आला आहे. आवश्यतेनुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणीही करण्यात आली. - अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, महापालिका
महापालिकेने ५ ऑगस्टला राज्याच्या नगरविकास विभागाला प्रभाग रचना सादर केली. नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला पाठविली. आयोगाने मान्यता दिल्यानंतर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली. महापालिका मुख्यालयाच्या आवारात ३२ प्रभागांचे ३२ नकाशे लावण्यात आले आहेत. नागरिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांकडून हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. त्यानंतर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल. - शेखर सिंह, आयुक्त, महापालिका
अशी असेल महापालिका प्रभागांची लोकसंख्या आणि रचना
एकूण प्रभाग - ३२
एकूण जागा- १२८