कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 09:16 IST2025-05-14T09:14:49+5:302025-05-14T09:16:08+5:30
एकच्या सुमारास तिने मोबाईलवर निकाल पाहिला. काही वेळाने ती बेडरूममध्ये गेली.

कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
पिंपरी :दहावीच्या परीक्षेत ३९ टक्के इतके कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थीनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना चन्होली फाटा येथील तनिष्क सोसायटीत मंगळवारी (दि. १३) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली.
सुप्रजा हरी बाबू (वय १६) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिचे वडील बँकेत नोकरीला आहेत. ती आई, वडील, मोठी बहीण आणि छोटा भाऊ यांच्यासोबत राहत होती. सुप्रजा हिने दहावीची परीक्षा दिली होती. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास तिने मोबाईलवर निकाल पाहिला. काही वेळाने ती बेडरूममध्ये गेली. बराच वेळ ती बाहेर न आल्याने तिच्या आईने जाऊन पाहिले असता ती साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. शेजारच्या रहिवाशांनी दिघी पोलिसांना कळवले.
बेशुद्धावस्थेतील सुप्रजाला त्वरित महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुप्रजा हिने अनुत्तीर्ण झाल्यामुळे आत्महत्या केली असावी, असा समज सुरुवातीला होता; परंतु नातेवाइकांनी पुन्हा तिचा निकाल पाहिला असता ती ३९ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाल्याचे समोर आले. दिघी पोलीस पुढील तपास करीत आहेत.