पाकिस्तानी नागरिकांच्या दीर्घकालीन व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:32 IST2025-05-09T15:30:59+5:302025-05-09T15:32:33+5:30
कागदपत्रे सादर करून अर्ज न केल्यास व्हिसा होईल रद्द

पाकिस्तानी नागरिकांच्या दीर्घकालीन व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी
पिंपरी : भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी पिंपरी- चिंचवडमध्ये लाँग व्हिसावर राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा व्हिसा प्रक्रिया करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत ऑनलाइन पद्धतीने ही सर्व प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा, असा आदेश केंद्र सरकारने दिला होता. गेल्या अनेक वर्षांत पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना भारताने आश्रय दिला आहे. यातील १११ पाकिस्तानी नागरिक लाँग व्हिसावर पिंपरी- चिंचवड शहरात वास्तव्यास असल्याचे समोर आले. पाकिस्तानातील धार्मिक अत्याचार आणि असह्य दैनंदिन जीवनाला कंटाळून अनेकांनी भारतात स्थायिक होण्यास पसंती दर्शविली आहे. सात वर्षांपेक्षा अधिक काळ देशात राहिलेल्या पाकिस्तानी हिंदू नागरिकांना आतापर्यंत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.
पहलगाम हल्ला आणि भारताने नुकतेच या हल्ल्याला दिलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ने दिलेले उत्तर पाहता सध्या देशाच्या सीमेवर तणाव वाढत आहे. त्यातच आता दीर्घकालीन (लाँग) व्हिसावर भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी काही कागदपत्रे सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ‘पाकिस्तानी नागरिकांचे दीर्घकालीन व्हिसा धोरण’अंतर्गत हा आदेश देण्यात आला आहे. भारतीय नागरिकत्व मिळाले नसलेल्या नागरिकांना ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. यामध्ये सध्याचा वैध व्हिसा, व्यवसाय आणि धर्म सिद्ध करणाऱ्या, अशा काही कागदपत्रांचा समावेश आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी याबाबतचे पत्र प्रसिद्ध केले असून, १० मे ते १० जुलै २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
...येथे करा ऑनलाइन अर्ज
भारतात राहणाऱ्या आणि भारतीय नागरिकत्व मिळालेले नसलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी १० मेपासून १० जुलै २०२५ पर्यंत ई-एफआरआरओ पोर्टलद्वारे (https://indianfrro.gov.in) पुन्हा ऑनलाइन अर्ज करावा. या कालावधीत पुन्हा अर्ज केला नाही, तर अशा पाकिस्तानी नागरिकांचा दीर्घकालीन व्हिसा रद्द करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.
पुन्हा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
१) वैध दीर्घकालीन व्हिसाची प्रत.
२) अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो (पांढरा पार्श्वभूमी)
३) नवीनतम निवासी पत्त्याच्या पुराव्याची प्रत.
४) व्यवसाय आणि धर्म सिद्ध करणारे तपशील.
५) जर भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज सादर केला असेल, तर अर्जाची प्रत.