Video : फटाका स्टॉलच्या मार्केटिंगसाठी गुन्हेगारी रील करणे तरूणाला भोवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 20:32 IST2025-10-14T20:31:16+5:302025-10-14T20:32:09+5:30
- वाकड पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवताच रिल्स बनवणाऱ्याने मागितली माफी

Video : फटाका स्टॉलच्या मार्केटिंगसाठी गुन्हेगारी रील करणे तरूणाला भोवले
पिंपरी : फटाका स्टॉलचे गुन्हेगारी स्टाईलने मार्केटींग करणे एका तरूणाला चांगलेच भोवले आहे. फटाक्यांच्या स्टॉलची प्रसिद्धी व्हावी, यासाठी तरूणाने टोळीयुद्धाचा बनावट प्रसंग साकारत गोळीबाराचे थरारक रील तयार केले. ही रील सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. थेरगाव येथे घडलेल्या या प्रकाराची वाकड पोलिसांनी गंभीर दखल घेत तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर पुन्हा असे रील बनवणार नाही, असे म्हणत या तरुणाने माफी मागितली.
राकेश मराठे असे या रीलबहाद्दर तरूणाचे नाव आहे. राकेश याला रिल्स बनवण्याचा छंद आहे. राकेश याने काळेवाडी - थेरगाव रस्त्यावर फटाका स्टॉल टाकला आहे. फटाक्यांच्या स्टॉलची प्रसिद्धी व्हावी, यासाठी तरूणाने टोळीयुद्धाचा बनावट प्रसंग साकारत गोळीबाराचे थरारक रील तयार केले. ‘थेरगावमध्ये खुलेआम घडलेला प्रकार’ असे कॅप्शन देत त्याने रील बनवला. हातात प्लास्टिकचे पिस्तूल घेत चेहर्यावर गुंडांच्या थाटात भाव आणि त्यानंतर दुचाकीवरील तरूणावर बनावट गोळीबाराचे दृश्य बनवले आणि शेवटी फटाक्यांच्या स्टॉलचे नाव आणि पत्ता झळकवला. हे रील व्हायरल झाल्यानंतर त्यातील दृश्य पाहून नागरिकांनी ती खरी घटना समजून घेतली. त्यामुळे घबराट पसरली. सोशल मीडियावर या रीलविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
फटाका स्टॉलच्या मार्केटिंगसाठी गुन्हेगारी रील करणे तरुणाला भोवले, वाकड पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवताच रिल्स बनवणाऱ्याने मागितली माफी #Pune#Policepic.twitter.com/xo8jm1pvSq
— Lokmat (@lokmat) October 14, 2025
फटाक्यांची जाहिरात करायची तर करा, पण गुन्हेगारी दाखवून प्रचार करणे योग्य नाही, असा संताप व्यक्त करत या प्रकाराकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. त्यानुसार, वाकड पोलिसांनी मंगळवारी (दि. १४) सकाळीच या बहाद्दराचा शोध घेत त्याला पोलिस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखवत त्याला समज दिली. त्यानंतर त्याने झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली. तसेच, संबंधित रील डिलीट केले. त्याने माफी मागितल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
फटाक्याच्या स्टॉलची जाहिरात करण्यासाठी संबंधित तरुणाचे गुन्हेगारीचे उदात्तीकरण होईल, असे रील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित तरुणाला पोलिस ठाण्यात आणले. त्याला समज देण्यात आली आहे. तरुणाने झाल्या प्रकाराबाबत माफी मागत रील डिलीट केले आहे. - शत्रुघ्न माळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड