हिंजवडीत नो एन्ट्री’’ची कडक अंमलबजावणी..! वाकड वाहतूक विभागाची बेशिस्त अवजड वाहनांविरुद्ध मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 13:48 IST2025-10-12T13:48:23+5:302025-10-12T13:48:42+5:30
विशेषतः भूमकर चौक परिसरात अवजड वाहनांना प्रवेशबंदीमुळे रोखण्यात आले होते, त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

हिंजवडीत नो एन्ट्री’’ची कडक अंमलबजावणी..! वाकड वाहतूक विभागाची बेशिस्त अवजड वाहनांविरुद्ध मोहीम
हिंजवडी : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच ठरावीक वेळेत नो एन्ट्री नियमांचे पालन न करणाऱ्या अवजड वाहनांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. शनिवारी (दि. ११) सकाळी सुमारे दहाच्या सुमारास वाकड वाहतूक विभागाने बेशिस्त अवजड वाहनांविरुद्ध मोहीम राबवली.
या कारवाईत ३० वाहनांवर गुन्हे दाखल केले असून, ७७ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे, अशी माहिती वाकड वाहतूक पोलिसांनी दिली. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर सात ठिकाणी नो एन्ट्री नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात आली. विशेषतः भूमकर चौक परिसरात अवजड वाहनांना प्रवेशबंदीमुळे रोखण्यात आले होते, त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, २ ऑगस्टच्या सुधारित आदेशानुसार आयटी परिसरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ९ या वेळेत अवजड वाहनांना प्रमुख मार्गांवर प्रवेशबंदी आहे. तरीदेखील काही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन सुरू असल्याने हिंजवडी आणि वाकड वाहतूक विभागांनी संयुक्तरीत्या ही मोहीम हाती घेतली.