आयटी कंपनीतील डेटाची चोरी करून ८२ कोटींचे नुकसान करणाऱ्या तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 14:18 IST2025-08-21T14:17:41+5:302025-08-21T14:18:14+5:30
- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची बाणेर येथील कंपनीत छापा टाकून कारवाई

आयटी कंपनीतील डेटाची चोरी करून ८२ कोटींचे नुकसान करणाऱ्या तिघांना अटक
पिंपरी : कंपनीचे गोपनीय सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन चोरून नवीन कंपनी स्थापन करून ८२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले. याप्रकरणी तिघांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली.
बिश्वजीत मिश्रा (वय ४५, रा. बाणेर, पुणे), नयुम शेख (४२, रा. कोंढवा, पुणे), सागर विष्णू (३९, रा. रहाटणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दत्तात्रय प्रभाकर काळे (४५, रा. थेरगाव) यांनी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना एप्रिल २०२४ पासून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत हिंजवडी येथील फ्युचरिइम टेक्नॉलॉजीज कंपनीत घडली.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळे यांची हिंजवडी येथे आयटी कंपनी आहे. त्यामध्ये संशयित काम करत होते. संशयितांनी संगनमत करून कंपनीसोबत केलेल्या कराराचा भंग केला. फिर्यादीच्या कंपनीतील गोपनीय आणि कॉपीराइट संरक्षित सोर्स कोड व सॉफ्टवेअर सोल्यूशनची चोरी केली. तसेच, १०० बेकायदेशीरपणे विकसित केलेल्या वेबसाइटचा मोबदला, अपॉर्च्युनिटी लॉस आणि इतर सेवांच्या माध्यमातून कंपनीचे ८२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले. संशयितांनी नवीन कंपनी स्थापन करून स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादीच्या कंपनीतील सॉफ्टवेअर सोल्यूशन आणि सोर्स कोडचा वापर केला.
याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण यांची पथके तयार केली. त्यांनी तांत्रिक तपास करून संशयित चालवीत असलेल्या बाणेर येथील नवीन कंपनीची माहिती काढली. या कंपनीमध्ये छापा मारून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लॅपटॉप, चार मोबाइल फोन जप्त केले. काळे यांच्या कंपनीचे यूएस येथील ग्राहक कंपनीसोबत मिळून संशयितांनी हा गुन्हा केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.