Sangvi Water Crisis: सांगवीत पाणीबाणी..! विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:57 IST2026-01-30T14:57:30+5:302026-01-30T14:57:50+5:30
रावेत येथील पाणी उपसा केंद्रातून अप्पूघर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या अशुद्ध जलवाहिनीला २५ जानेवारी रोजी गळती लागल्याचे निदर्शनास आले.

Sangvi Water Crisis: सांगवीत पाणीबाणी..! विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे हाल
सांगवी : रावेत येथील मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे सांगवी व परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाला आहे. आधीच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना, या बिघाडामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, विशेषतः नोकरदार वर्ग व गृहिणींचे हाल झाले आहेत.
रावेत येथील पाणी उपसा केंद्रातून अप्पूघर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या अशुद्ध जलवाहिनीला २५ जानेवारी रोजी गळती लागल्याचे निदर्शनास आले. या तांत्रिक बिघाडाचा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला. महापालिकेने २५ व २६ जानेवारी रोजी दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची पूर्वसूचना दिली होती. मात्र, दुरुस्तीचे काम पूर्ण होऊनही पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या विस्कळीत पाणीपुरवठ्याचा सर्वाधिक फटका नोकरदार वर्ग व गृहिणींना बसला आहे. सोमवारी सायंकाळी व मंगळवारी सकाळी अनेक भागांत पाणी उशिरा व कमी दाबाने आले, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णतः बंद होता. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांची मोठी धावपळ झाली. पाण्याचे नियोजन कोलमडल्याने गृहिणींचेही दैनंदिन वेळापत्रक विस्कळीत झाले. जुनी सांगवी येथील पाण्याच्या टाकी परिसरात सकाळपासून पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मधुबन सोसायटी, आनंदनगर, गंगानगर, सातपुडा सोसायटी या भागांतील नागरिकांना पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागला.
दुरुस्तीचे काम सुरू, सहकार्य करण्याचे आवाहन
मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले असून, यंत्रणा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत होईल. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे व पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहअभियंता साकेत पवरा यांनी केले आहे.